(संगमेश्वर / एजाज पटेल)
राज्य परिवहन महामंडळाकडून सातत्याने तिकीट दर वाढविले जात असताना प्रवाशांना मिळणारी सेवा मात्र दिवसेंदिवस खालावत चालल्याचा आरोप होत आहे. देवरुख आगारातील अनेक एसटी बस मोडकळीस आलेल्या व तांत्रिकदृष्ट्या नादुरुस्त असल्याने प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालपरीची अवस्था सध्या अत्यंत दयनीय बनली आहे.
भर रस्त्यात गाड्या बंद; प्रवाशांचे हाल
देवरुख आगारातील अनेक बसमध्ये तुटलेली व फाटलेली आसने, तुटलेल्या खिडक्या आणि अन्य मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यातच या बस प्रवासादरम्यान अचानक बंद पडण्याच्या घटनाही वाढल्याचा आरोप केला जात आहे. अनेकदा ग्रामीण भागातील निर्जन रस्ते, घाटमार्ग किंवा जंगल परिसरात बस बंद पडल्याने महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अशा घटनांची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
संगमेश्वर स्थानकात बॅटरीचा स्फोट
काही दिवसांपूर्वी देवरुख आगारातून लांब पल्ल्याच्या मार्गावर धावणाऱ्या एका एसटी बसची बॅटरी संगमेश्वर बसस्थानकात अचानक मोठ्या आवाजात फुटल्याची घटना घडली. सुदैवाने त्यावेळी बस स्थानकात उभी होती. ही घटना प्रवासादरम्यान किंवा घाटमार्गावर घडली असती, तर गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता होती. या प्रकारामुळे एसटी बसच्या तांत्रिक तपासणी आणि देखभालीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चालक-वाहकांनाही मनस्ताप
बस रस्त्यात बंद पडल्यानंतर अनेकदा प्रवाशांसह चालक आणि वाहकांनाही बसला धक्का मारून ती सुरू करण्याचा प्रयत्न करावा लागतो. नुकताच अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये प्रवासी चिखलात बसला धक्का मारताना दिसत आहेत. आगार प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा फटका चालक-वाहकांनाही बसत असून, त्यांना प्रवाशांच्या नाराजीला सामोरे जावे लागत असल्याचे बोलले जात आहे.
बसस्थानकांची पाहणी झाली; बसेसच्या स्थितीकडेही लक्ष हवे
राज्याचे परिवहन मंत्र्यांनी अलीकडे मुंबईसह कोकणातील विविध एसटी स्थानके आणि उपहारगृहांना भेटी देऊन स्वच्छता व व्यवस्थेची पाहणी केली. काही ठिकाणी समाधान व्यक्त करण्यात आले, तर काही ठिकाणी अधिकाऱ्यांना सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, बसस्थानकांसह मार्गावर धावणाऱ्या एसटी बसची तांत्रिक स्थिती, अंतर्गत सुविधा आणि सुरक्षिततेचीही पाहणी होणे आवश्यक असल्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
महामंडळाने तिकीट दरवाढीबरोबरच प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि दर्जेदार सेवा देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. देवरुख आगाराने तातडीने सर्व बसची तांत्रिक तपासणी करून नादुरुस्त गाड्या दुरुस्त कराव्यात, तसेच प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी प्रवासी आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.

