(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तथागत भगवान बुद्धांच्या उपदेशाचे मूळ स्वरूप समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी पाली भाषा शिकण्याकडे रत्नागिरी जिल्ह्यातील अभ्यासकांचा वाढता कल अधोरेखित झाला आहे. मुंबई विद्यापीठ संलग्न सिद्धार्थ महाविद्यालय, मुंबई यांच्या माध्यमातून सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात राबविण्यात आलेल्या ‘डिप्लोमा इन पाली’ या एक वर्षीय अभ्यासक्रमात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व दहा विद्यार्थ्यांनी यश संपादन करत शंभर टक्के निकालाची उल्लेखनीय कामगिरी नोंदविली.
पाली भाषा अभ्यासक प्रा. दिलीप वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यासक्रम ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात आला. अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षा सिद्धार्थ महाविद्यालय, मुंबई येथे घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर हे यश मिळविले. या परीक्षेत एन. बी. कदम (१८२ गुण) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर विशाखा सकपाळ (१७९ गुण), प्रदीप जाधव (१७७ गुण), विजय यशवंत जाधव (१७३ गुण), संघमित्रा कुरतडकर (१७३ गुण), अलका धनावडे (अनामिका जाधव) (१७१ गुण), जयेश जाधव (१६९ गुण), विजय गोविंद जाधव (१६५ गुण), ज्योती जगताप (१५० गुण) आणि संजय आयरे (१४१ गुण) यांनी यश मिळवत रत्नागिरी जिल्ह्याचा गौरव वाढविला.
या यशामागे प्रा. दिलीप वासनिक यांचे परिश्रम, नियोजनबद्ध अध्यापन आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. पाली भाषेच्या अध्ययनासाठी त्यांनी घेतलेल्या विशेष मेहनतीमुळे विद्यार्थ्यांना विषय सुलभपणे आत्मसात करता आला, असेही विद्यार्थ्यांनी नमूद केले आहे. पाली ही केवळ प्राचीन भाषा नसून ती तथागत भगवान बुद्धांच्या मानवकल्याणकारी तत्त्वज्ञानाची मूळ अभिव्यक्ती मानली जाते. समता, प्रज्ञा, शील, करुणा आणि अहिंसा या वैश्विक मूल्यांचा संदेश पाली भाषेतील त्रिपिटक आणि इतर ग्रंथांमधून व्यक्त झाला आहे. बुद्धांची चौर्याऐंशी हजार स्कंधांमध्ये विखुरलेली शिकवण समजून घेण्यासाठी पाली भाषेचा अभ्यास अनिवार्य मानला जातो.
केंद्र शासनाने पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर या भाषेच्या अध्ययनाला नव्याने चालना मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर पाली भाषेचा प्रचार, प्रसार आणि संवर्धन करण्याची जबाबदारी नव्या पिढीने स्वीकारणे आवश्यक असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले. बुद्धांचे मानवतावादी विचार समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी पाली भाषेचे ज्ञान प्रभावी माध्यम ठरू शकते, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. पाली भाषेच्या या यशस्वी उपक्रमामुळे रत्नागिरी जिल्ह्यात बुद्धविचारांच्या शास्त्रशुद्ध अध्ययनाला नवी दिशा मिळाल्याचे मानले जात असून, आगामी काळात अधिकाधिक युवकांनी या अभ्यासक्रमात सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

