(नागपूर )
राज्यात नागपूर शहराने मेट्रो प्रकल्पाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली ठसा उमटवला आहे. नागपूरमध्ये उभारण्यात आलेल्या देशातील सर्वात लांब डबल डेकर मेट्रो व्हायाडक्टची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे. या ऐतिहासिक प्रकल्पामुळे नागपूर शहराची ओळख जागतिक स्तरावरील प्रगत शहरी वाहतूक व्यवस्थेच्या उदाहरणांमध्ये झाली आहे.
कामठी महामार्गावर उभारण्यात आलेल्या ५.६२ किलोमीटर लांबीच्या या डबल डेकर मेट्रो व्हायाडक्टचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या वेळी महा मेट्रोला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे प्रमाणपत्र अधिकृतरित्या प्रदान करण्यात आले.
या भव्य व्हायाडक्टची वैशिष्ट्ये
- सिंगल कॉलम पिअरवर आधारित चारस्तरीय उड्डाणपूल
- पहिल्या स्तरावर महामार्ग
- दुसऱ्या स्तरावर मेट्रो ट्रॅक
- तर तिसऱ्या स्तरावर जमिनीवरील आधीपासून असलेला मार्ग

या उड्डाणपुलावर गड्डीगोदाम चौक, कडबी चौक, इंदोरा चौक, नारी रोड आणि ऑटोमोटिव्ह चौक अशी ५ मेट्रो स्थानकं उभारण्यात आली आहेत. या प्रकल्पात ‘रिब अँड स्पाइन’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, १६५० टन क्षमतेचे संरचनात्मक काम शहरी भागात पहिल्यांदाच यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. स्थापत्यकलेतील आणि अभियांत्रिकीतील हे एक अद्वितीय उदाहरण मानले जात आहे.
या प्रकल्पामुळे कामठी मार्गावरील वाहतूक कोंडीत लक्षणीय घट झाली असून, इंधन आणि वेळेची बचत होत आहे. त्यामुळे नागपूरकर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी २०२२ मध्येही महामेट्रोने वर्धा मार्गावर ३.१४ किमी लांबीचा डबल डेकर व्हायाडक्ट तयार करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली होती. मात्र, कामठी मार्गावरील हा नवीन प्रकल्प त्या विक्रमालाही मागे टाकून नव्या इतिहासाची नोंद करत आहे.
जागतिक दर्जाच्या या पुरस्कारामुळे नागपूर हे जगातील उत्कृष्ट पायाभूत सुविधा असलेले शहर म्हणून नवीन ओळख निर्माण झाली असल्याचे गौरवउद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. या जागतिक पुरस्काराबद्दल महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
रामगीरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष उपस्थितीत गिनिज वर्ल्ड रेकार्डचे भारतातील प्रतिनिधी स्वप्नील डोंगरीकर यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना गिनिज वर्ल्ड रेकार्डमध्ये नोंद झाल्याचे प्रमाणपत्र प्रमाणपत्र प्रदान केले.

