( नवी दिल्ली )
भारतीय रेल्वे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे जाळे आहे, आणि आता या भव्य नेटवर्कमध्ये आणखी एक ऐतिहासिक भर पडणार आहे. देशातील एकमेव अशा मिजोरम राज्यात, जिथे आजवर रेल्वे पोहोचली नव्हती, तिथे आता रेल्वे प्रथमच धावणार आहे. यामुळे मिझोरमची राजधानी ऐझॉल ही थेट भारतीय रेल्वे नकाशावर दाखल होणार आहे.
या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे उद्घाटन १३ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. बैराबी ते सैरंग दरम्यानचा ५१.३८ किमी लांबीचा हा रेल्वे मार्ग, प्रगत अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना मानला जात आहे. या मार्गावर १४२ पूल, ४८ बोगदे, आणि उच्चभ्रू तांत्रिक सुविधा असलेले सैरंग रेल्वे स्थानक विकसित करण्यात आले आहे. विशेषतः या मार्गावरील पूल क्र. १९६ हा १०४ मीटर उंच, म्हणजे दिल्लीच्या कुतुबमिनारपेक्षा अधिक उंच असून, तो देशातील सर्वात उंच रेल्वे पूलांपैकी एक मानला जात आहे.
मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी या ऐतिहासिक प्रकल्पाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सैरंग रेल्वे स्थानकाला जागतिक दर्जाचे सुविधाकेंद्र म्हणून विकसित केले जाणार आहे. पुढील टप्प्यात राजधानी एक्सप्रेस सेवा देखील येथून सुरू करण्यात येईल. हा रेल्वे प्रकल्प केंद्र सरकारच्या ‘ॲक्ट ईस्ट पॉलिसी’चा एक भाग असून, ईशान्य भारतातील राज्यांना देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा आणि या भागाच्या व्यापार, पर्यटन आणि आर्थिक विकासाला चालना देण्याचा उद्देश त्यामागे आहे.
सुरुवातीला ही रेल्वे लाईन मिझोरमला आसाममधील सिलचर या महत्त्वाच्या शहराशी जोडेल, त्यानंतर ती संपूर्ण देशाच्या रेल्वे नेटवर्कशी जोडली जाणार आहे. अशा प्रकारे, ऐझॉल आणि मिझोरम राज्याचे देशाच्या अन्य भागांशी थेट रेल्वे माध्यमातून जोडले जाणे, हे प्रादेशिक विकासाच्या दृष्टीने एक क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे.

