(नवी दिल्ली)
महाराष्ट्रात 4G कनेक्टिव्हिटी 100 टक्के पूर्ण झाल्यानंतर राज्याची 5G कनेक्टिव्हिटीच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी संसदेत दिली. एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी राज्यातील डिजिटल पायाभूत सुविधांच्या प्रगतीचा आढावा सादर केला.
संपूर्ण राज्यात डिजिटल कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत करण्यासाठी आतापर्यंत सुमारे 1,64,000 4G आणि 40,000 5G बेस ट्रान्सीव्हर स्टेशन्स (BTS) उभारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या विस्तारामुळे शहरी तसेच ग्रामीण भागांतील दूरसंचार सेवांमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचेही त्यांनी सांगितले.
कोकणात 4G–5G नेटवर्कचा मोठा विस्तार
केंद्रीय मंत्र्यांनी विशेषतः कोकण विभागातील डिजिटल पायाभूत सुविधांच्या विस्तारावर भर देताना सांगितले की, विविध जिल्ह्यांमध्ये 4G आणि 5G नेटवर्कचे व्यापक जाळे उभारण्यात आले आहे. जिल्हानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे—
- पालघर: 5,463 (4G) | 1,609 (5G) BTS
- ठाणे: 6,710 (4G) | 1,989 (5G) BTS
- रायगड: 2,940 (4G) | 791 (5G) BTS
- रत्नागिरी: 2,292 (4G) | 465 (5G) BTS
- सिंधुदुर्ग: 975 (4G) | 256 (5G) BTS
या नेटवर्क विस्तारामुळे कोकणातील शहरी, ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये इंटरनेट वेग व सेवा गुणवत्तेत मोठी सुधारणा झाल्याचे त्यांनी नमूद केले.
डिजिटल इंडिया अंतर्गत 5G विस्तारावर भर
ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ उपक्रमानुसार केंद्र सरकार देशातील प्रत्येक नागरिकाला सुलभ, वेगवान आणि विश्वासार्ह डिजिटल कनेक्टिव्हिटी देण्यासाठी कटिबद्ध आहे. आगामी काळात 5G नेटवर्कच्या आणखी विस्तारामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील डिजिटल सक्षमीकरणाला नवी गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

