(मुंबई)
सुमारे पंधरा दिवसांपूर्वी ‘मराठी विरुद्ध हिंदी’ असा वाद महाराष्ट्रात उफाळून आला होता. या दरम्यान भाजपचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसावर आणि ठाकरे कुटुंबावर अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. “तुम्ही महाराष्ट्रात बॉस असाल, तर बिहार, उत्तर प्रदेश किंवा तामिळनाडूत या, आम्ही तुम्हाला उचलून-उचलून आपटून मारू,” असा धमकीवजा इशारा त्यांनी दिला होता. या वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.
एक जाहीर सभेत बोलताना राज ठाकरे म्हणाले, “भाजपाचा एक दुबे नावाचा खासदार म्हणतो – ‘मराठी लोकांना पटक पटक के मारेंगे’. ही भाषा वापरली जाते आणि त्याच्यावर ना केस होते ना ही बातमी राष्ट्रीय मीडियात झळकते. यावरूनच लक्षात येतं की गोष्टी कशा पद्धतीने चालतात.” यानंतर त्यांनी आक्रमक पवित्रा घेत दुबेंना थेट आव्हान दिलं. “दुबे… तू मुंबईत येऊन दाखव. तुला मुंबईतल्या समुद्रात ‘डुबे डुबे’ के मारेंगे,” असे म्हणत त्यांनी उपस्थितांमध्ये हास्याची लाट उसळवली.
“तुमची सत्ता संसदेत असेल, पण आमची सत्ता रस्त्यावर आहे” – राज ठाकरे
राज ठाकरे पुढे म्हणाले, “या सगळ्यांना हिंमत येते कशी? कारण त्यांना माहीत असतं की सरकार त्यांच्या पाठीशी आहे. मराठी माणूस जर काही बोलला, तर त्याचं राष्ट्रीय स्तरावर कव्हरेज होतं. पण हे लोक जेव्हा बोलतात, तेव्हा कुणीही आवाज उठवत नाही.” “तुमचं वर्चस्व लोकसभेत किंवा विधानभवनात असेल, पण आमचं वर्चस्व रस्त्यावर आहे. त्यामुळे जर कोणी महाराष्ट्रात असभ्य वर्तन केलं, तर माझा महाराष्ट्र सैनिक त्याचा गाल आणि त्याचा हात या दोघांची युती करून दाखवेल,” असा इशारा देत राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर ठाम भूमिका मांडली.