( मुंबई )
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या अध्यक्ष व सभापतीपदाच्या निवडणुका २० मार्चपूर्वी होणार आहेत. ग्रामविकास विभागाने याबाबत अधिकृत आदेश जारी केल्याने राज्याच्या ग्रामीण राजकारणात हालचालींना वेग आला आहे. आता सत्ता स्थापनेसाठी पक्षीय पातळीवर जोरदार जुळवाजुळव सुरू झाली आहे.
७ फेब्रुवारी रोजी या १२ जिल्हा परिषदांतील आणि १२५ पंचायत समित्यांतील निवडणूक प्रक्रिया पार पडली होती, तर ९ फेब्रुवारीला निकाल जाहीर झाले. मात्र अध्यक्ष आणि सभापतीपदाच्या निवडणुकांची तारीख जाहीर न झाल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. अखेर ग्रामविकास विभागाने गुरुवारी आदेश काढत २० मार्चपूर्वी पहिली सर्वसाधारण बैठक घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियमातील कलम ११(१) व ५९(१) नुसार निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ पहिल्या बैठकीपासून सुरू होतो.
या निवडणुका रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, लातूर आणि परभणी या १२ जिल्ह्यांमध्ये झाल्या आहेत. अनेक जिल्हा परिषदांमध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे सत्तेसाठी आघाड्या आणि युतींची गणिते पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहेत.
महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांमध्ये सत्तेसाठी वेगवेगळी समीकरणे तयार होत आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी महायुतीतील तीनही पक्ष अनेक ठिकाणी परस्परविरोधी भूमिका घेताना दिसत आहेत. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात कोणती आघाडी यशस्वी ठरणार आणि अध्यक्षपदावर कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

