(मुंबई)
प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक अत्यंत भावनिक आणि मोठा निर्णय सोशल मीडियावर शेअर केला आहे. लग्नाच्या 17 वर्षांनंतर, राहुल आणि त्यांच्या पत्नी नेहा देशपांडे यांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर 2024 मध्ये दोघांचा कायदेशीर घटस्फोट शांततेत पार पडला असून, नातं संपलं असलं तरी दोघांमध्ये परस्पर सन्मान टिकून आहे, असं राहुल यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमधून स्पष्ट केलं आहे.
“ही गोष्ट शेअर करण्याआधी स्वतःला वेळ दिला” – राहुल देशपांडे
राहुल देशपांडे म्हणाले, “माझ्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात. त्यामुळे ही वैयक्तिक पण महत्त्वाची गोष्ट शेअर करणं मला आवश्यक वाटलं. नेहा आणि मी 17 वर्षे अनेक सुंदर आठवणींसह एकत्र होतो. आता आम्ही एकमेकांच्या निर्णयाचा सन्मान करत स्वतंत्र आयुष्य जगत आहोत.” या निर्णयाबाबत घाई न करता वेळ घेऊन, विशेषतः त्यांच्या मुलीच्या हिताचा विचार करून हे पाऊल उचलल्याचंही त्यांनी सांगितलं.
“मुलगी रेनुकाचं कल्याण; माझं सर्वोच्च प्राधान्य”
आपल्या मुलीबाबत बोलताना राहुल म्हणाले, “रेनुका ही आमच्या दोघांची जबाबदारी आहे. तिच्या भविष्याच्या दृष्टीने आम्ही नेहमीच सहकार्य करू. जरी आम्ही आता वेगवेगळ्या वाटांवर असलो तरी आमचं पालकत्त्व, प्रेम आणि स्थैर्य कायम राहील”

नव्या अध्यायाची सुरुवात
राहुल आणि नेहा यांचा हा निर्णय केवळ एका नात्याचा शेवट नसून, स्वतंत्र जीवनाच्या नव्या अध्यायाची सुरुवात आहे. दोघांनीही हा निर्णय परिपक्वतेने, शांततेने आणि परस्पर आदर राखत घेतला आहे, जे एक समंजसपणाचं उदाहरण ठरू शकतं. सोशल मीडियावर त्यांच्या या पोस्टवर प्रेमळ आणि सहानुभूतीने भरलेल्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी या निर्णयाचा आदर व्यक्त करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

