( मुंबई )
राज्यसभेच्या निवडणुकांसाठी महायुतीकडून जोरदार तयारी सुरू असून, उमेदवारांची नावं जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेत जागावाटपावर अंतिम टप्प्यात चर्चा सुरू असतानाच महायुतीतील घटक पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रामदास आठवले यांना यावेळी राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक
देशभरात राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, त्यात महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश आहे. या जागांसाठी 16 मार्च 2026 रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी निकालही जाहीर केले जाणार आहेत.
महाराष्ट्रातून एप्रिल 2026 मध्ये निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस एसपी), रामदास आठवले (रिपाइं-ए), डॉ. भागवत कराड (भाजप), धैर्यशील पाटील (भाजप), रजनी पाटील (काँग्रेस), प्रियांका चतुर्वेदी (शिवसेना यूबीटी), फौजिया खान (राष्ट्रवादी एसपी) यांचा समावेश आहे.
भाजपकडून आठवलेंचा पत्ता कट?
रामदास आठवले यांचा पक्ष महायुतीचा घटक पक्ष असला, तरी यावेळी भाजपकडून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार नाही, असे संकेत राजकीय सूत्रांकडून मिळत आहेत. भाजप नेते नितीन नवीन यांच्याकडून उमेदवारीबाबत नकारात्मक संदेश दिल्याचीही चर्चा आहे. दिल्लीहून मुंबईत परतल्यानंतर रामदास आठवले हे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात असून, उमेदवारीसाठी ते अखेरपर्यंत प्रयत्नशील असल्याची माहिती आहे.
मंत्रीपदावरही टांगती तलवार
2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर मोदी मंत्रिमंडळात रामदास आठवले यांना तिसऱ्यांदा केंद्रात राज्यमंत्री पद देण्यात आलं आहे. सध्या ते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आहेत. मात्र, ते पुन्हा राज्यसभेवर निवडून आले नाहीत, तर तांत्रिकदृष्ट्या त्यांचं मंत्रीपद आपोआप संपुष्टात येणार आहे. त्यामुळे भाजपने त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली, तरच त्यांचं मंत्रीपद कायम राहू शकतं.
महायुतीतील जागावाटप, भाजपची रणनीती आणि आगामी राज्यसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांच्या भवितव्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे. उमेदवारीवर अंतिम निर्णय काय होतो, याकडे आता सर्वांची नजर आहे.

