( कोल्हापूर )
करवीर तालुक्यातील केर्ले येथील सहावीच्या वर्गात शिकत असलेल्या कु स्वरूप दिपकराज माने (वय १३, रा. केर्लेपैकी मानेवाडी) या विद्यार्थ्यांचा शाळेच्या गेटचा दरवाजा अंगावर पडून मृत्यू झाला. करवीर तालुक्यातील केर्ले येथील कन्या कुमार विद्यामंदिर शाळेच्या गेटचा लोखंडी दरवाजा अंगावर पडल्याने ही दुर्घटना घडली. ही दुर्दैवी घटना आज सकाळच्या सुमारास घडली. मुलाच्या अपघाती मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची करवीर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मानेवाडीतून मराठी शाळा दीड किलोमीटर लांब असल्याने पालक मुलाला दुचाकीवरून सकाळी शाळेत सोडून आले होते. वर्गात आल्यावर शिक्षकांनी हजेरी घेतल्यानंतर शिक्षकांना सांगून स्वरूप लघूशंकेसाठी वर्गाबाहेर गेला. त्यावेळी शाळेतील गेटच्या दरवाजातून जात असताना अचानक नादुरूस्त असलेले लोखंडी गेट स्वरूपच्या अंगावर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर जखम होवून रक्तस्त्राव झाला. बेशुध्द अवस्थेत त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत झाल्याचे घोषित केले.