( महाड )
मुंबई–रामदास पठार (MH-20-BL-3775) ही एसटी बस वरंध गावाजवळ पोहोचली असता अचानक स्टेअरिंग जाम होणे आणि ब्रेक व्यवस्थित न लागणे यामुळे बसचा ताबा सुटला. मात्र चालकाने प्रसंगावधान राखून बस डोंगराच्या बाजूच्या साइड पट्टीवर वळवली आणि मोठा अनर्थ टळला. या बसमध्ये २० शालेय विद्यार्थी आणि १३ इतर प्रवासी प्रवास करत होते. अपघातात एकूण ३० प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना वरंध प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून उपचार सुरू आहेत.
अपघाताच्या वेळी बस थेट दरीत कोसळण्याची शक्यता होती. पण चालकाने वेळीच साइड पट्टीकडे बस वळवल्याने प्रवाशांचे प्राण वाचले. स्थानिकांच्या मते, महाड आगारातील अनेक एसटी बसेस कालबाह्य व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वारंवार बंद पडत आहेत. तरीदेखील या बसेस ग्रामीण व घाट मार्गावर धाडल्या जात असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

