AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता ही आजच्या युगातील सर्वात मोठी तांत्रिक क्रांती मानली जाते. यामुळे अनेक गोष्टी सुलभ झाल्या असल्या तरी त्याचे गंभीर तोटेही आहेत, याची जाणीव प्रत्येकाने ठेवणे आवश्यक आहे. AI च्या सहाय्याने सध्या फसवणुकीचे नवनवे प्रकार समोर येत आहेत. स्कॅमर AI तंत्रज्ञानाचा वापर करत मुलांचे, वृद्धांचे किंवा सामान्य नागरिकांचे आवाज, ओळखी, बँक माहिती वापरून फसवणूक करत आहेत.
खाली अशा काही प्रमुख AI-आधारित फसवणुकींची माहिती :
व्हॉइस क्लोनिंग स्कॅम
काही अत्याधुनिक AI टूल्स फक्त काही सेकंदांचा ऑडिओ क्लिप वापरून एखाद्या व्यक्तीचा हुबेहूब आवाज तयार करू शकतात. या तंत्रज्ञानाचा वापर करून स्कॅमर तुमच्या नातेवाईकांचा आवाज तयार करतात आणि अचानक “मी अडचणीत आहे, मला तात्काळ पैसे पाठव” असा कॉल करतात. वृद्ध व्यक्ती या प्रकारात अधिक सहजपणे फसतात, कारण त्यांना अशा तंत्रज्ञानाची माहिती कमी असते.
डीपफेक व्हिडिओ स्कॅम
डीपफेक हे AI-निर्मित फसवणूक करणारे व्हिडिओ असतात. यात एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचा चेहरा, देहबोली, आवाज वापरून खोट्या गोष्टी सांगितल्या जातात. हे व्हिडीओ अगदी खरे वाटावेत असे तयार केले जातात, आणि त्याद्वारे ब्लॅकमेलिंग, फसवणूक किंवा मानसिक त्रास दिला जातो. विशेषतः महिलांना लक्ष्य करून अशा क्लिप्स व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळले जातात.
AI-निर्मित फेक वेबसाइट्स
AI च्या मदतीने स्कॅमर खऱ्या दिसणाऱ्या, पण फसवणूक करणाऱ्या वेबसाइट्स तयार करतात. त्यानंतर त्या वेबसाइट्सच्या लिंक ईमेल, सोशल मीडिया किंवा मेसेजेसद्वारे पाठवून युजर्सना आकर्षित केलं जातं. या वेबसाइट्सवर सवलतीच्या ऑफर्स, प्रसिद्ध ब्रँड्सच्या जाहिराती असतात – पण एकदा का क्लिक केलंत, की तुमचा डेटा, बँक डिटेल्स, पासवर्ड्स स्कॅमरच्या हाती लागतात.
काय काळजी घ्याल?
-
अनोळखी कॉल्स, विशेषतः अचानक पैसे मागणारे कॉल्स घेण्यापूर्वी सत्यता तपासा.
-
एखादा व्हिडीओ खरा वाटला, तरी त्याबाबत पूर्ण खात्री करून घ्या
-
लिंकवर क्लिक करण्याआधी वेबसाइटचा URL तपासा.
-
बँक किंवा कोणतीही महत्त्वाची माहिती कोणत्याही अनोळखी सोशल मिडिया platform वर पाठवू नका
AI हे प्रगत आणि उपयुक्त तंत्रज्ञान असले तरी, ते वापरणाऱ्याचा उद्देश जर फसवणुकीचा असेल, तर ते गंभीर संकटाचे कारण ठरू शकते. त्यामुळे प्रत्येकाने सजग आणि सतर्क राहणे अत्यावश्यक आहे.

