( नागपूर )
नागपूरहून कोलकात्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे पक्षी धडकून इंजिन आणि विमानाच्या पुढील भागाचे नुकसान झाल्यामुळे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सुदैवाने, वैमानिकाच्या तत्परतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती देण्यात आली आहे.
इंडिगोच्या ६E812 क्रमांकाच्या फ्लाइटने मंगळवार (२ सप्टेंबर) सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी नागपूर विमानतळावरून उड्डाण घेतले. मात्र थोड्याच वेळात, हवेत असताना विमानाला पक्षी धडकला. धडकेमुळे इंजिनाजवळील भागासह विमानाच्या पुढच्या भागाचेही नुकसान झाले. ही बाब लक्षात येताच वैमानिकाने प्रसंगावधान राखत तात्काळ यू-टर्न घेऊन नागपूर विमानतळावर सुरक्षित आपत्कालीन लँडिंग केले. या विमानात माजी आमदार सुधाकर कोहळे, शेखर भोयर तसेच काँग्रेस नेते नितीन कुंभलकर हे देखील प्रवास करत होते.
विमानतळाचे वरिष्ठ संचालक आबिद रुही यांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षी धडकेची शक्यता असून, या संपूर्ण घटनेची चौकशी सुरू आहे. दरम्यान, याआधी २ जून रोजीही असाच प्रकार घडला होता. रांचीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला पक्षी धडकल्यानंतर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते. त्या वेळीही विमानातील सर्व १७५ प्रवासी सुरक्षित होते.

