(पंढरपूर)
पंढरपूर–मंगळवेढा रस्त्यावरील शरदनगर परिसरात सोमवारी पहाटे भीषण अपघात झाला. भाविकांनी भरलेल्या क्रूझर आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने एका निष्पाप लहान मुलासह चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर मंगळवेढा आणि सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डोंबिवली आणि ठाणे येथील भाविक तुळजापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर येथे देवदर्शन करून क्रूझरमधून पंढरपूरकडे आले होते. विठुरायाचे दर्शन घेऊन ते रात्री साडेनऊच्या सुमारास पंढरपूरहून मुंबईला रेल्वेने परतणार होते. मात्र, पंढरपूर–मंगळवेढा मार्गावरील शरदनगरजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने क्रूझर आणि कंटेनरची समोरासमोर भीषण टक्कर झाली.
हा अपघात इतका भीषण होता की क्रूझरच्या चालक बाजूचा भाग पूर्णपणे चिरडला गेला. त्या बाजूला बसलेले भाविक जागीच ठार झाले. घटनास्थळी रक्ताने माखलेला रस्ता, विव्हळणाऱ्या जखमींचा आक्रोश आणि निष्पाप लहानग्याचा निश्चल देह पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे, एपीआय विनोद लातूरकर, वाहतूक शाखेचे संभाजी यादव यांच्यासह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णवाहिकांच्या सहाय्याने मंगळवेढा येथील ग्रामीण व खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील एका गंभीर जखमी भाविकास पुढील उपचारासाठी सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
गंभीर जखमींमध्ये महिला व पुरुष भाविकांचा समावेश असून सहा ते सात जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. देवदर्शनाच्या आनंदात सुरू झालेला प्रवास क्षणातच शोकांतिकेत बदलल्याने डोंबिवली, ठाणे आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
एका निष्पाप लहान मुलासह चार भाविकांचा असा दुर्दैवी अंत काळजाला चटका लावणारा असून, या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

