( मुंबई )
राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले आहेत. 15 तारखेला होणाऱ्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी अंतिम टप्प्यात असून बैठका, रणनीती आणि उमेदवार याद्यांना वेग आला आहे. अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. मनसेचे दोन प्रभावी नेते राज ठाकरेंची साथ सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत दाखल झाले आहेत. यामुळे एकीकडे शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली असताना, दुसरीकडे मनसेसमोरील अडचणी वाढल्याचं चित्र आहे.
राज ठाकरेंना मोठा धक्का
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सचिव आणि भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजन गावंड यांनी आज आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासोबत भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक पाटील, राष्ट्रीय कोषाध्यक्ष राम शिंदे, जनसंपर्क प्रमुख राज ठाकूर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.
तसेच मनसेचे जिल्हा सचिव ॲड. शैलेंद्र करले, भिवंडी मनसे विभाग अध्यक्ष श्रीनाथ भैरी, अनिल पवार, राजू प्रेस्थान यांच्यासह ठाणे जिल्हा प्रकल्पग्रस्त हितकारी कृती समितीचे जिल्हा सचिव कुणाल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम पाटील, यश शिंदे, हनुमंत भुरके यांनीही भगवा झेंडा हाती घेतला.
मानवता सेवा संघाचे पदाधिकारी शिव वाघेरा, प्रतीक्षा वाघेरा, प्रियांका वाघेरा, हर्षल वाघेरा, अनिता जाधव, सरिता चारु, प्रतिभा चित्ते, शरद शिंदे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी सर्व नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, पक्ष पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबईतही मनसेला फटका
मुंबईतही मनसेला धक्का बसला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण केबल सेनेचे अध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक 217 मधील इच्छुक उमेदवार परेश तेलंग यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला आहे. मनसेकडून उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी शिवसेनेचा मार्ग स्वीकारल्याची माहिती समोर आली आहे.
या घडामोडींमुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत मनसेला राजकीय नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद निवडणुकीआधीच लक्षणीयरीत्या वाढल्याचं चित्र आहे.

