(तिरुअनंतपुरम)
केरळमधील कोझिकोड येथे ‘मेंदू खाणाऱ्या अमीबा’ने म्हणजेच “नेग्लेरिया फाउलेरी”मुळे अमीबिक एन्सेफलायटीसचा धोकादायक प्रादुर्भाव झाला असून, या संसर्गामुळे आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या दहा रुग्ण कोझिकोड मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार घेत आहेत, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते, उपचार घेत असलेल्या दहा रुग्णांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या दोघांनाही यकृताशी संबंधित आजार असून, ते कोझिकोड, मलप्पुरम आणि वायनाड जिल्ह्यांतील रहिवासी आहेत.
महिला आणि तीन महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू
नेग्लेरिया फाउलेरी संसर्गामुळे अलीकडील काळात तीन महिन्यांच्या बाळासह ५२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. बाळाला विहिरीच्या पाण्यामुळे संसर्ग झाला होता. ८ ऑगस्टपासून त्याच्यावर माता व बाल आरोग्य विभागाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
दुसरी घटना मलप्पुरम जिल्ह्यातील वेंगारा भागातील आहे. एका ५२ वर्षीय महिलेचा १ ऑगस्ट रोजी नेग्लेरिया फाउलेरी संसर्गाचे निदान झाले होते. सुरुवातीला तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती अधिक बिघडल्याने तिला कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले, पण तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
यकृत व हृदयाच्या रुग्णांना अधिक धोका
डॉक्टरांनी सांगितले की, यकृत व हृदयविकारासारख्या आजारांनी ग्रस्त रुग्णांना नेग्लेरिया फाउलेरी संसर्ग झाल्यास गुंतागुंत होण्याची शक्यता जास्त असते. हा संसर्ग अतिशय वेगाने वाढतो आणि मेंदूपर्यंत पोहोचतो. मात्र, विदेशातून मिळवलेली औषधे व सुधारित उपचारपद्धतीमुळे काही प्रमाणात सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.
नेग्लेरिया फाउलेरी म्हणजे काय?
नेग्लेरिया फाउलेरी हा एक दुर्मीळ, पण अतिशय घातक अमिबा आहे. तो गोड्या पाण्यात विशेषतः तलाव, डबकी, व विहिरींसारख्या पाण्याच्या स्रोतांमध्ये आढळतो. पोहताना किंवा पाण्यात डुंबताना तो नाकातून शरीरात प्रवेश करतो आणि थेट मेंदूपर्यंत पोहोचतो. मात्र, तो गिळल्यास संसर्ग होत नाही, कारण पोटातील आम्ल त्याला नष्ट करते.
रोगाची लक्षणे:
- तीव्र डोकेदुखी
- ताप
- उलट्या
- मान कडक होणे
- झटके येणे
प्रतिबंधक उपाय
आरोग्य अधिकाऱ्यांनी याबाबत काळजी घेण्यासाठी पोहताना विशेष सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. नाकात पाणी जाण्यापासून प्रतिबंध करणे आणि वापरात असलेल्या पाण्याच्या स्रोतांची नियमित स्वच्छता आणि देखरेख करणे अत्यंत आवश्यक आहे. संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी जनजागृती वाढवण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याची लागण झाल्यास स्थानिक प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे.

