(मुंबई)
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात (CSMVS) ‘नेटवर्क्स ऑफ द पास्ट’ (Networks of the Past) ही नवी स्टडी गॅलरी शुक्रवारी अधिकृतपणे प्रेक्षकांसाठी खुली करण्यात आली आहे. या गॅलरीच्या माध्यमातून प्राचीन भारत आणि त्या काळातील भारताचे जगाशी असलेले संबंध, व्यापार, संस्कृती आणि विचारांची देवाणघेवाण यांचा सुमारे 5 हजार वर्षांपूर्वीचा इतिहास उलगडणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.
या नव्या गॅलरीत भारतासह इजिप्त, मेसोपोटेमिया, ग्रीस, रोम, पारस, चीन तसेच अखंड भारतातील सुमारे 300 दुर्मिळ आणि मौल्यवान प्राचीन वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. या वस्तूंच्या माध्यमातून प्राचीन काळात विविध देशांमध्ये व्यापार, लेखन, धर्म, कला आणि तत्त्वज्ञान यांद्वारे कसे परस्पर संबंध निर्माण झाले होते, याचे सजीव दर्शन घडते.

गॅलरीच्या प्रवेशद्वारावर हडप्पा संस्कृतीकालीन शहराची आकर्षक प्रतिकृती उभारण्यात आली आहे. जेजे स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी साकारलेली ही प्रतिकृती त्या काळातील जलव्यवस्था, बंधारे, वसाहती, पाण्याचा निचरा आणि वाहतूक व्यवस्था यांचे सविस्तर चित्रण करते.
प्रदर्शनात चीनमधील विविध प्राचीन कलाकृतींनाही विशेष स्थान देण्यात आले आहे. यामध्ये दागिने, प्राण्यांच्या प्रतिकृती, मानवी पुतळे, प्राचीन नाणी तसेच त्या काळातील शेतीपद्धती यांची माहिती शिल्पांच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. याशिवाय रोमन काळातील शिलालेख, राजांनी जनतेला दिलेले संदेश तसेच मृत्यूनंतर दफन करण्याच्या पद्धती यांची माहिती देणाऱ्या कलाकृतीही येथे पाहायला मिळतात.
महाराष्ट्रातील विविध भागांमधून संकलित केलेल्या पुरातन वस्तू, शिलालेख आणि ऐतिहासिक अवशेषांचाही या गॅलरीत समावेश आहे. भारतातील तसेच महाराष्ट्रातील प्राचीन संस्कृतींचे महत्त्वाचे घटक आणि जगभरातील पुरातन संस्कृतींची वैशिष्ट्ये एकाच ठिकाणी पाहण्याची संधी या प्रदर्शनातून मिळत आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर गेली चार वर्षे काम करण्यात आले आहे. गेट्टी फाउंडेशनच्या ‘शेअरिंग कलेक्शन्स प्रोग्राम’च्या माध्यमातून या उपक्रमाला सहकार्य लाभले आहे. ब्रिटिश म्युझियमसह बर्लिन, झुरिच, अथेन्स, कुवेत येथील नामांकित संग्रहालयांनी या गॅलरीसाठी मौल्यवान वस्तू उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय आणि देशातील अनेक संग्रहालयांचा या उपक्रमात सक्रिय सहभाग आहे.
इतिहास, संस्कृती आणि जागतिक वारसा यांची सांगड घालणारी ‘नेटवर्क्स ऑफ द पास्ट’ ही गॅलरी अभ्यासक, विद्यार्थी आणि इतिहासप्रेमींसाठी एक महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहे.

