(रत्नागिरी)
जेव्हा एखादं काम प्रामाणिक आणि लोकोपयोगी असतं, तेव्हा त्याची दखल लोक नक्कीच घेतात. अशाच प्रामाणिक कार्याचा गौरव करण्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर गावातील मयूर भितळे या तरुणाने आपल्या घरी गणेशोत्सवानिमित्त आगळीवेगळी सजावट साकारली आहे.
या वर्षी भितळे कुटुंबीयांनी जिजाऊ संस्थेचे प्रमुख श्री. नीलेश सांबरे यांनी रत्नागिरीकरांसाठी उभारलेले ‘श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय’ याची हुबेहुब प्रतिकृती साकारली आहे. या रुग्णालयात हजारो रुग्णांना मोफत उपचार मिळत असून, या सेवाभावनेने प्रभावित होऊन हा देखावा साकारण्यात आला आहे.
भितळे कुटुंबीय दरवर्षी गणेशोत्सवात सामाजिक संदेश देणारी सजावट करतात. याआधी त्यांनी गोवर्धन पर्वत, सिंधुताई सपकाळ यांचे जीवनकार्य, शेतकऱ्याची आत्महत्या यांसारख्या विषयांवरही देखावे सादर केले होते.
व्यवसायाने इलेक्ट्रिशियन असलेले मयूर भितळे यांनी संपूर्ण श्रावण महिनाभर परिश्रम घेऊन हा देखावा साकारला आहे. या उपक्रमात त्याला शुभम आग्रे, तेजस खापरे, सौरव बळकटे, संजय खापरे आणि मारुती लोहार यांनी मदत केली. तसेच जिजाऊ संस्थेचे जिल्हाध्यक्ष अॅड. महेंद्र मांडवकर आणि सचिव केदार चव्हाण यांनीही प्रोत्साहन दिले.
रुग्णालयाची मुख्य इमारत जशीच्या तशी प्रतिकृती बनविल्यामुळे हा देखावा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक गर्दी करत आहेत. आतापर्यंत जवळपास दोन हजार नागरिकांनी या अनोख्या आरासेला भेट दिली असून, अनंत चतुर्दशीपर्यंत हा देखावा सर्वांसाठी खुला राहणार आहे.

