(मुंबई)
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन सोमवारी चौथ्या दिवशीही सुरू असून, परिस्थिती अधिकच तीव्र झाली आहे. सोमवारपासून जरांगे यांनी पाणीही न पिण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारसोबतच्या चर्चांमध्ये यश न मिळाल्याने आंदोलन लांबत चालले आहे. तर पावसामुळे आझाद मैदानात तात्पुरती उभारलेली तंबू, गाद्या आणि कपडे भिजले आहेत. यामुळे आंदोलकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. दीर्घकाळ मैदानात मुक्कामी थांबल्याने आरोग्य आणि स्वच्छतेची स्थिती बिघडत चालली आहे.
आंदोलनाचा फटका केवळ या आंदोलकांपुरताच मर्यादित नाही, तर मुंबईकरांनाही बसत आहे. आझाद मैदान, सीएसटी, मंत्रालय परिसर तसेच मुख्य प्रवेशमार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचल्यामुळे स्वच्छतेचे मोठे संकट उभे राहिले आहे.
कचरा व्यवस्थापन महत्त्वाचे आव्हान
मुंबई महापालिकेने आझाद मैदान, सीएसटी परिसर आणि इतर आंदोलनस्थळी स्वच्छतेसाठी सुमारे १२०० कर्मचारी तीन शिफ्टमध्ये तैनात केले आहेत. गेल्या तीन दिवसांत सुमारे २२ मेट्रिक टन कचरा उचलला गेला असून, एकूण कचरा ३० मेट्रिक टनांपेक्षा जास्त आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “एवडे मोठे आणि आक्रमक स्वरूपाचं आंदोलन आम्ही प्रथमच पाहतो आहोत. स्वच्छता राखताना आम्ही अक्षरशः हतबल झालो आहोत.”
वाहतुकीची स्थिती बिकट
२९ ऑगस्टपासून वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. लाखो आंदोलकांसोबत आलेल्या हजारो वाहनांमुळे मुख्य मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईत येणाऱ्या वाहनांची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात असून, सुमारे ८०,००० वाहनांना यु-टर्न देत मुंबईत प्रवेश टाळला आहे.
रेल्वे प्रशासनावर ताण
मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले की, सीएसएमटी स्थानकाजवळ आंदोलन सुरू असल्याने, आंदोलनकर्ते रात्री मुक्कामी याच परिसरात थांबत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात हजारोंचा जमाव रात्रीतून ठाण मांडतो, ज्यामुळे सुरक्षेपासून स्वच्छतेपर्यंत अनेक समस्या उद्भवत आहेत. स्थानकावर तणाव वाढला असून, नियोजन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
सामाजिक संस्थांची मदत आणि परिणाम
विविध सामाजिक संस्था आंदोलकांना अन्न, नाश्ता आणि फळांचे वाटप करत आहेत. परंतु यामुळे स्थानक परिसरात कचऱ्याचे ढीग साचले असून, दुर्गंधीने वातावरण दूषित झाले आहे. रेल्वे स्थानकाच्या देखभालीसाठी आता अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
अजून 5 कोटी मराठे धडकणार
सरकारच्या हातून अजूनही वेळ गेलेली नाहीये. सरकारनं तात्काळ मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा अजून 5 कोटी मराठे मुंबईत धडकणार असल्याचा इशारा जरांगेंनी दिला. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारकडून मागण्यांवर अद्यापही तोडगा न निघाल्यामुळे जरांगेंनी सरकारला पुन्हा इशारा दिलाय. लवकरात लवकर आरक्षण द्या अन्यथा 5 कोटी मराठे मुंबईत धडकणार असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंआहे. यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग आणखी वाढणार असल्याची चिन्हे आहेत.
मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आंदोलन अधिक तीव्र होत चालले असून, त्याचा परिणाम केवळ आंदोलनस्थळीच नव्हे, तर संपूर्ण मुंबई शहरावर दिसून येत आहे. स्वच्छता, वाहतूक आणि सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनावर प्रचंड ताण आहे. तसेच आंदोलकांचीही स्थिती बिकट झाली असून, पावसामुळे अडचणी वाढल्या आहेत. मात्र परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

