(नवी दिल्ली)
केरळच्या नर्स निमिषा प्रिया हिला येमेनमध्ये १६ जुलै रोजी फाशी देण्यात येणार आहे. तिचा जीव वाचवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, “येमेनची राजकीय स्थिती लक्षात घेता भारत सरकार फारसे काही करू शकत नाही.” केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले की, येमेनमध्ये भारताचे औपचारिक राजनैतिक प्रतिनिधित्व नाही. त्यामुळे सार्वजनिकरीत्या किंवा थेट हस्तक्षेपाची मर्यादा आहे. सरकारने खाजगी चॅनेल्सद्वारे सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे नमूद केले.
सरकारी वकील वेंकटरमनी यांचे विधान
सरकारची बाजू मांडताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या प्रतिनिधीने, वरिष्ठ वकील के. वेंकटरमनी यांनी सांगितले की, “येमेनसारख्या संवेदनशील देशात सार्वजनिक हस्तक्षेपामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होऊ शकते. म्हणून आम्ही खाजगी पातळीवर प्रयत्न करत आहोत.”
‘ब्लड मनी’चा पर्याय सुचवला गेला
याचिकाकर्त्यांनी सरकारला विनंती केली होती की, पीडित व्यक्तीच्या कुटुंबासोबत वाटाघाटी करून, शरिया कायद्यानुसार ‘ब्लड मनी’ (रक्तपैसे) देण्याची प्रक्रिया सुरू केली जावी. निमिषा प्रिया यांच्या कुटुंबाने पीडित कुटुंबाला ८.६ कोटी रुपयांची ऑफर दिल्याची माहिती देण्यात आली. तथापि, सरकारने स्पष्ट केले की ब्लड मनी ही पूर्णतः खाजगी वाटाघाटीची प्रक्रिया आहे आणि ती अधिकृतरित्या सरकारमार्फत केली जाऊ शकत नाही. सरकारने असेही सांगितले की, काही स्थानिक प्रभावशाली व्यक्तींच्या माध्यमातून वाटाघाटींसाठी अद्यापही प्रयत्न सुरू आहेत.
कोण आहे निमिषा प्रिया?
निमिषा प्रिया केरळच्या पलक्कड जिल्ह्याची निवासी आहे. तिचं वय 38 वर्ष असून ती पेशाने नर्स आहे. निमिषा प्रिया या 2008 पासून त्या येमेनमध्ये नर्स म्हणून कार्यरत होत्या. त्या तेथे एका स्थानिक व्यक्तीसोबत नर्सिंग होम चालवत होत्या. ती कामासाठी आपल्या कुटुंबासोबत गेली होती. या दरम्यान येमेनमध्ये अशांतता निर्माण झाली. त्यामुळे तिचा पती आणि मुलगी दोघे भारतात परतले. ते तीन वर्ष येमेनमध्ये राहिले, नंतर ते भारतात निघून आले. निमिषाने कुटुंबाच्या पालनपोषणासाठी तिथेच राहण्याचा निर्णय घेतला.
2017 मध्ये त्या तलाल अब्दो मेहदी नावाच्या येमेन नागरिकाच्या हत्या प्रकरणात अडकल्या. यमेनमध्ये एक नियम आहे. जर परदेशी मेडिकल प्रॅक्टिशनरला क्लीनिक ओपन करायचं असेल, तर त्याला येमेनी नागरिकाला पार्टनर बनवावं लागतं. त्यामुळेच तिने तलाल अब्दो महदीला आपलं पार्टनर बनवलं. पण त्याने कागदपत्रात हेराफेरी करुन निमिषासोबत लग्न केल्याचा खोटा दावा केला. तिचा पासपोर्ट महदीच्या ताब्यात होता. अनेक वर्ष त्याने निमिषाच शारीरिक आणि आर्थिक शोषण केलं. वारंवार धमक्या दिल्या.
2017 साली निमिषाने महदीच्या तावडीतून निसटण्यासाठी त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. पासपोर्ट तिला परत मिळवायचा होता. पण त्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न जीवघेणा ठरला. त्यात महदीचा मृत्यू झाला. आरोपानुसार, त्या व्यक्तीचा खून करून मृतदेहाचे तुकडे अंडरग्राउंड टाकीत टाकण्यात आले. मात्र, निमिषा यांचे म्हणणे आहे की, हा प्रकार आत्मरक्षणाच्या उद्देशाने झाला, कारण मेहदी नावाच्या येमेन नागरिकाने तिच्यावर दीर्घकाळ शारीरिक अत्याचार केले होते. त्या काळात त्याने तिचा पासपोर्टही लपवून ठेवला होता. निमिषा सध्या येमेनमधील सना सेंट्रल तुरुंगात बंद आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेले अंतिम अपीलही फेटाळण्यात आल्याने, आता तिच्या फाशीची शिक्षा अटळ झाल्याचे चित्र आहे.
दरम्यान, १६ जुलै २०२५ रोजी फाशीची तारीख निश्चित झाल्याने, संपूर्ण देशाचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे. सरकारच्या मर्यादा असूनही, निमिषा प्रियाचा जीव वाचवण्यासाठी काही मार्ग निघतो का, याकडे साऱ्या देशवासीयांचे लक्ष लागून आहे.

