(छत्रपती संभाजीनगर)
काँग्रेसचे स्थानिक नेते आणि माजी महापौर अब्दुल रशीद खान उर्फ रशीद मामू यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेशावरून छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात तणाव निर्माण झाला आहे. अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत थेट मातोश्रीवर हा प्रवेश पार पडला. मात्र, या घडामोडीची कल्पना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना देण्यात न आल्याने त्यांनी उघडपणे विरोध दर्शवला.
सोमवारी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीदरम्यान, भर रस्त्यात चंद्रकांत खैरे यांनी रशीद मामू यांना “माझा तुला विरोध आहे, तिकीट देणार नाही” असे स्पष्ट शब्दांत सांगितले. या विधानावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे म्हणाले की, कोणी निवडणूक लढवायची हा निर्णय पक्षप्रमुख घेतात. आजच्या राजकारणात कोणाचा भरवसा राहिलेला नाही. त्यामुळे कोणासाठी शिफारस करून प्रतिष्ठा पणाला लावण्याचे दिवस राहिलेले नाहीत.
प्रवेशानंतरही वाद थांबलेला नाही. चंद्रकांत खैरे यांनी आरोप केला की, ज्यांनी महापालिकेत शिवसेनेविरोधात भूमिका घेतली, वंदे मातरमला विरोध केला आणि देशविरोधी वक्तव्य केली, अशा व्यक्तीला पक्षात घेण्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे अशा नेत्याला पक्षात घेण्यास आपण स्पष्ट नकार दिल्याचे खैरे यांनी सांगितले.
या प्रकरणावर बोलताना अंबादास दानवे यांनी भाजप आणि मित्रपक्षांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. “शिंदे गटातील आमदारांवर असलेल्या आरोपांकडे कोणी लक्ष का देत नाही? अजित पवार गटातील काही नेत्यांवर गंभीर आरोप आहेत, त्यावर मौन का? आमच्याकडे आल्यावर तो वादग्रस्त आणि तुमच्याकडे आल्यावर तो मोठा नेता, असा दुजाभाव का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दानवे यांनी स्पष्ट केले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अंतिम निर्णय घेणारे आहेत. सर्वेक्षणात जो सक्षम उमेदवार असेल, त्यालाच उमेदवारी दिली जाईल. सध्याच्या परिस्थितीत कोण कुठे जाईल याचा अंदाज नसल्याने कोणासाठी शब्द देणे अवघड झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, पुण्यातील महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर बोलताना दानवे म्हणाले की, प्रत्येक पक्षाचा निर्णय त्यांचा आहे. अजित पवार यांच्यासोबत जाणे म्हणजे भाजपासोबत जाण्यासारखे आहे. आमचे कार्यकर्ते सक्षम असून गरज पडल्यास स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे संकेतही त्यांनी दिले.
काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशिद खान उर्फ मामू हे छत्रपती संभाजीनगरमधील एक परिचित आणि प्रभावी नेते मानले जातात. त्यांनी यापूर्वी महापौरपद भूषवले असून, शहरात तसेच अल्पसंख्याक समाजात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. अनेक वर्षे काँग्रेसमध्ये सक्रिय भूमिका बजावलेल्या या नेत्याने पक्ष सोडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसला मोठे खिंडार पडल्याचे मानले जात आहे.
या प्रवेश सोहळ्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. अब्दुल रशिद खान यांच्यासोबत त्यांच्या अनेक समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे हा प्रवेश केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित न राहता, संघटनात्मकदृष्ट्या ठाकरे गटासाठी फायदेशीर ठरणारा मानला जात आहे.

