(मुंबई)
मुंबईतील गणेशोत्सव हा भव्यतेसाठी आणि श्रद्धेसाठी ओळखला जातो. त्यातही किंग्ज सर्कल येथील ‘जीएसबी सेवा मंडळ’ यांचा गणपती देशातील सर्वात श्रीमंत गणपतींपैकी एक मानला जातो. यंदा या मंडळाकडून तब्बल ₹474.46 कोटी रुपयांचा विमा उतरवण्यात आला आहे, जो आतापर्यंतच्या सर्व गणेशोत्सव मंडळांमध्ये सर्वाधिक आहे. गेल्या वर्षी या मंडळाने ₹400 कोटी रुपयांचा विमा घेतला होता, त्याच्या तुलनेत यावर्षी ही रक्कम लक्षणीयरीत्या वाढली आहे.
मंडळाने स्पष्ट केलं आहे की यावर्षी केवळ बाप्पाच्या दागिन्यांसाठी सुमारे ₹67 कोटी रुपयांचं विमा संरक्षण घेतलं आहे. या विम्यामध्ये गणेशमूर्तीवरील सोनं, चांदी आणि मौल्यवान रत्नांचा समावेश आहे. तसेच, मंडळातील पुजारी, सेवक, स्वयंसेवक, स्वयंपाकी आणि सुरक्षा रक्षक यांच्यासाठी ₹375 कोटी रुपयांचा वैयक्तिक अपघात विमा काढण्यात आला आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सामाजिक दायित्वाच्या अंतर्गत ₹30 कोटी रुपयांचं संरक्षण, तर आग, भूकंप आणि इतर जोखमींसाठी ₹2 कोटींचा विमा घेतला आहे. याशिवाय अग्निशमन आणि विशेष जोखीम व्यवस्थापनासाठी ₹43 लाखांचं कव्हर देखील घेतलं आहे.
यंदा गणपती बाप्पाला 66 किलो सोनं आणि 336 किलो चांदीच्या दागिन्यांनी सजवलं आहे. हे सर्व दागिने भाविकांनी नवस पूर्ण झाल्यानंतर अर्पण केलेले आहेत. बाप्पाच्या हातांचे सोन्याचे आकार, कानांवरील रत्नजडित अलंकार, सोंडेवर सोन्याची नक्षी आणि चांदीच्या मखराची आकर्षक सजावट अशा विविध अलंकारांनी गणेशमूर्तीला साजेशी भव्यता प्राप्त झाली आहे. जीएसबी सेवा मंडळाकडून सांगण्यात आलं की, हे अलंकार गेल्या अनेक वर्षांतील भाविकांच्या अर्पणांमधून तयार झालेले आहेत.
जीएसबीचा गणपती पाच दिवसांसाठी विराजमान असतो आणि या काळात फक्त धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. दिवसभर पूजा, होमहवन आणि भक्तांच्या ‘तुला’ अशा धार्मिक विधींचं आयोजन असतं. भाविक आपल्या नवसासाठी बाप्पाला नवस करतात आणि नवस पूर्ण झाल्यानंतर नारळ, गूळ, फळं किंवा इतर वस्तूंची ‘तुला’ करून अर्पण करतात. सकाळी 6 ते सायंकाळी 7 पर्यंत भाविकांची गर्दी असते. या ‘तुला’मध्ये आलेले पदार्थ नंतर प्रसाद म्हणून वाटले जातात.
गणेशोत्सवाच्या पाच दिवसांपुरता मर्यादित नसलेली जीएसबी सेवा मंडळाची सेवा वर्षभर सुरू असते. मंडळाकडून वाळकेश्वर भागात नियमित अन्नदान कार्यक्रम राबवला जातो. यापूर्वी केईएम आणि टाटा रुग्णालयांमध्ये अन्नदान केलं जात होतं, मात्र आता गरजूंच्या गरजा लक्षात घेता वाळकेश्वर परिसरात ही सेवा केंद्रित करण्यात आली आहे. याशिवाय गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वैद्यकीय मदत आणि इतर सामाजिक उपक्रमांमध्येही मंडळ सक्रिय सहभाग घेतं.
जीएसबी सेवा मंडळाचा गणपती हा केवळ श्रीमंतीसाठी नाही, तर श्रद्धा, सेवा, आणि सामाजिक बांधिलकीसाठीही ओळखला जातो. भव्य मूर्ती, अलंकारांची श्रीमंती, आणि भाविकांसाठी करण्यात येणाऱ्या सेवांसह हा उत्सव खर्या अर्थाने भक्तीचा आणि समर्पणाचा प्रतीक बनला आहे.

