(मुंबई)
फसवणूक आणि स्पॅम कॉल्सना रोखण्यासाठी सरकारने एक मोठं पाऊल उचललं आहे. सरकारने कोट्यावधी मोबाइल कनेक्शन आणि लाखो व्हॉट्सॲप अकाउंटवर बंदी घातली आहे. यामध्ये बनावट कागदपत्रांद्वारे घेतलेल्या कनेक्शन्सचा आणि ज्यांच्यावर संशयास्पद हालचाली आढळल्या आहेत, अशा कनेक्शन्सचा समावेश आहे. दूरसंचार विभाग (DoT) सोबत काम करणाऱ्या चार दूरसंचार सेवा प्रदात्यांनी (TSPs) 45 लाख बनावट आंतरराष्ट्रीय कॉल्स भारतीय दूरसंचार नेटवर्कपर्यंत पोहोचण्यापासून रोखले आहेत. याशिवाय काही व्हॉट्सॲप अकाउंटलाही टार्गेट करण्यात आले आहे.
1.77 कोटी मोबाईल कनेक्शन तोडले
1 ऑक्टोबरपासून देशभरात नवीन दूरसंचार नियम लागू झाले आहेत. सरकारने ग्राहकांची सुरक्षा लक्षात घेऊन हे नियम लागू केले. आता फसवणूक आणि स्पॅम कॉलला आळा घालण्यासाठी सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला असून 1.77 कोटी मोबाईल कनेक्शन बंद केले आहेत. बनावट कागदपत्रे वापरून घेण्यात आलेल्या मोबाईल कनेक्शन्सवर ही कारवाई करण्यात आली.
सायबर गुन्ह्यांचा समावेश
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, खंडित केलेल्या मोबाईल कनेक्शनपैकी 33.48 लाख कनेक्शनचा वापर कधीतरी सायबर गुन्ह्यांसाठी करण्यात आला होता. 77.61 लाख कनेक्शन्स असे आहेत जे टेलिकॉम नियमांच्या विरोधात होते. एवढेच नाही तर सरकारने त्या हँडसेटवरही हंटर लाँच केले आहे, ज्यांचा सायबर गुन्ह्यांमध्ये किंवा फसवणुकीमध्ये वापर केला गेला आहे.
व्हॉट्सॲप अकाउंटवर बंदी
खंडित मोबाइल कनेक्शनशी जोडलेली 11 लाख बँक खाती आणि पेमेंट वॉलेट फ्रीज करण्यात आले आहेत. यासोबतच अंदाजे 11 लाख व्हॉट्सॲप अकाउंटही बंद करण्यात आली आहेत. मंत्रालयाने 71 हजार पॉइंट ऑफ सेल म्हणजेच सिम एजंट्सनाही ब्लॉक केले आहे.
केंद्राने शुक्रवारी सांगितले की, आतापर्यंत बनावट कागदपत्रांद्वारे मिळवलेले 1.77 कोटी मोबाईल कनेक्शन खंडित करण्यात आले आहेत. हे कनेक्शन आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) द्वारे ओळखले गेले आहेत. पुढे, दूरसंचार विभाग (DoT) च्या सहकार्याने चार दूरसंचार सेवा प्रदात्यांनी (TSPs) यशस्वीरित्या एक प्रगत प्रणाली लागू केली आहे. दूरसंचार मंत्रालयाने सांगितले की पुढच्या टप्प्यात एक केंद्रीकृत प्रणाली स्थापित केली जात आहे जी सर्व TSP मध्ये उर्वरित बनावट कॉल दूर करेल. ही प्रणाली लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. DOT ने प्रगत प्रणाली आणली आहे. हे आंतरराष्ट्रीय बनावट कॉल ओळखण्यासाठी आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी ते ब्लॉक करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
49,930 मोबाईल हँडसेट ब्लॉक
मंत्रालयाने सांगितले की, सायबर गुन्ह्यांचे हॉटस्पॉट असलेल्या जिल्ह्यांमध्ये 1.77 कोटींपैकी 33.48 लाख मोबाईल कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. या जिल्ह्यांमध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेले 49,930 मोबाईल हँडसेटही ब्लॉक करण्यात आले आहेत. मर्यादेपेक्षा जास्त मोबाईल कनेक्शन घेतलेल्या लोकांचे 77.61 लाख मोबाईल कनेक्शन बंद करण्यात आले आहेत.