(महाड)
येत्या ६ जून रोजी किल्ले रायगडावर ३५२वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा पारंपरिक उत्साहात साजरा होणार आहे. यंदा देशभरातून लाखो शिवभक्त गडावर दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवली जात असून, मागील वर्षीच्या गर्दीचा विक्रम मोडला जाण्याची शक्यता आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या आयोजनासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीने विशेष आवाहन केले असून, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात शिवभक्त दाखल होणार आहेत. गेल्या वर्षी चार लाखांहून अधिक शिवभक्तांनी उपस्थिती लावली होती. यंदा ही संख्या लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता असून, ५ जूनपासूनच शिवभक्तांची रेलचेल सुरू होईल असा अंदाज आहे.
प्रशासनाची जोरदार तयारी
गडावरील संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त व सुविधा पुरवण्याची तयारी करण्यात आली आहे. सुमारे २,००० पोलीस कर्मचारी, तसेच ७०० शासकीय अधिकारी व हजारो स्वयंसेवक या ठिकाणी कार्यरत असतील. रायगडच्या पहिल्या महिला जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी पदभार स्वीकारताच गडाचा दौरा केला असून, सुरक्षेच्या उपाययोजना आणि मागील वर्षीच्या त्रुटींचा आढावा घेतला आहे. यंदा दोन पोलीस उपाधीक्षक, ११ उपविभागीय अधिकारी, २८ निरीक्षक, १४० उपअधीक्षक, ९०० पोलीस कर्मचारी आणि १३५ वाहतूक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.
शिवभक्तांसाठी पाणी, आरोग्य व वाहतूक व्यवस्था
गडावर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून बाटल्या आणि टँकरच्या माध्यमातून पाण्याचा मुबलक पुरवठा होणार आहे. वाहनांची पार्किंग व्यवस्था कोंझर व पाचाड येथे करण्यात आली असून, त्या ठिकाणांहून एसटी बसमार्फत शिवभक्तांना रायगडकडे नेण्यात येईल. महाड एसटी आगाराकडून अतिरिक्त बस मागवण्यात आल्या आहेत. चिट दरवाजापासून पायी चढाई करणाऱ्या शिवभक्तांसाठी आरोग्य विभागाची पथके गडावर आणि पायरी मार्गावर तैनात असतील, जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन स्थितीत तात्काळ उपचार मिळू शकतील.