(रत्नागिरी / प्रतिनिधी)
पावसाळा आणि गरमागरम मक्याचे कणीस यांचे नाते अविभाज्य मानले जाते. रिमझिम पावसात कणीस चावण्याची मजा काही औरच! पण यंदा या चवीसोबत किंमतीची ‘कडवट’ चव ग्राहकांना चाखावी लागत आहे.
पूर्वी रस्त्यावरील टपऱ्यांवर फक्त दहा रुपयांत मिळणारे मक्याचे कणीस आता तब्बल पन्नास रुपयांत फक्त दोन मिळत असल्याने ग्राहकांची चांगलीच कोंडी झाली आहे. पावसाळ्याच्या हंगामात शहरातील अनेक ठिकाणी टपऱ्यांवर कणीस विक्री होत असली, तरी दरवाढीमुळे सर्वसामान्यांना सहजासहजी ‘कणसाचा आनंद’ घेता येत नाही. कणीस भाजण्यासाठी लागणारा खर्च, उत्पादन कमी होणे आणि बाजारातील महागाई यामुळे किंमती वाढल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे असले, तरी खिशाला झळ बसणाऱ्या ग्राहकांसाठी मात्र ही मोठी कटकट ठरत आहे.
पावसाळ्यात कणीस विक्रीची लगबग वाढते. शहरात सर्वत्र टपऱ्यांवर भाजलेल्या व उकडलेल्या अशा दोन प्रकारांमध्ये कणीस सहज उपलब्ध होत आहे. भाजलेले कणीस हे चवीला खमंग लागते. कोळशावर भाजण्यासाठी वेळ व मेहनत जास्त लागत असली, तरी ग्राहकांची पहिली पसंती यालाच मिळते. तर दुसरीकडे, उकडलेलं कणीस तुलनेने सोपे पातेल्यात उकडून चटणी, मीठ, लिंबूसह ग्राहकांना दिले की काम भागते. मेहनत कमी, खर्चही कमी, आणि नफा मात्र तुलनेने जास्त. या दोन्ही प्रकारांना आपापले चाहते आहेत. पण महागाईमुळे दर वाढल्याने ग्राहक ‘चव की किंमत?’ या प्रश्नात सापडले आहेत.

