(बीड /अंबाजोगाई)
पोलिस दलातील माजी पोलिस निरीक्षक सुनील रामराव नागरगोजे (वय ५७) यांनी अंबाजोगाईतील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री ८ वाजता उघडकीस आली असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागरगोजे हे मूळचे बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील नागदरा गावचे रहिवासी होते. त्यांनी अनेक वर्षे पोलिस सेवेत काम केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी निलंबित करण्यात आले होते. एप्रिल महिन्यात त्यांच्या निलंबनाची कारवाई झाली होती. त्यांच्या अंबाजोगाईत नवीन घराचे घर बांधकाम सुरु होते. तोपर्यंत ते प्रशांत नगर येथे भाड्याने राहत होते. सोमवारी रात्री, घरात कोणी नसताना त्यांनी सिलिंग फॅनला दोरी लावून गळफास घेतला. ही घटना उशिरा उघडकीस आली आणि नातेवाईकांनी तात्काळ संबंधित यंत्रणांना माहिती दिली.
आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही
त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. पोलिसांनी तपास सुरू केला असून, नागरगोजे यांनी कोणतीही चिठ्ठी लिहिल्याचे प्राथमिक तपासात आढळलेले नाही. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. नागरगोजे यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

