( मुंबई )
महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात मोठा बदल होणार असून इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला राज्यस्तरीय सुकाणू समितीने मंजुरी दिली आहे. ही माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. यामुळे येत्या जून 2026 पासून दुसरी, तिसरी आणि चौथीसोबतच सहावीचा सुधारित अभ्यासक्रम राज्यभर लागू होणार आहे.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या कार्यालयात मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. नवीन अभ्यासक्रम National Education Policy 2020 (राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020) नुसार तयार करण्यात आला असून विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित रचना करण्यात आली आहे. तसेच काठिण्यपातळीचे संतुलन राखून विषयांची मांडणी करण्यात आली आहे.
या अभ्यासक्रमाला सुकाणू समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर तो पुढील प्रक्रियेसाठी शालेय शिक्षण आयुक्तांच्या अधिपत्याखालील अभ्यासक्रम समन्वय समितीकडे पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर पाठ्यपुस्तक निर्मितीची जबाबदारी बालभारतीकडे सोपवली जाणार असून नवीन पुस्तके शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे.
दरम्यान, दुसरी, तिसरी आणि चौथीच्या नवीन अभ्यासक्रमासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. State Council of Educational Research and Training Maharashtra (एससीईआरटी) तर्फे राज्यस्तरीय मुख्य प्रशिक्षण याच महिन्यात आयोजित करण्यात आले असून त्यानंतर जिल्हास्तरावर शिक्षक प्रशिक्षणाचे टप्पे पूर्ण केले जाणार आहेत.
या बदलामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत शिक्षण अधिक परिणामकारक आणि कौशल्याधारित करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे.

