(अहमदाबाद)
अहमदाबाद विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई करत बँकॉकहून आलेल्या एका तरुणीच्या ट्रॉली बॅगमधून तब्बल ४ किलो हायब्रिड गांजा जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थाची किंमत सुमारे ४ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
सुरुवातीला संबंधित तरुणीने तिची बॅग हरवल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, बॅग सापडल्यानंतर जेव्हा कस्टम अधिकाऱ्यांनी तिला संपर्क केला, तेव्हा ती विमानतळावर परत आली नाही. यामुळे अधिकाऱ्यांना संशय आला आणि बॅगची सखोल तपासणी करण्यात आली. तपासात बॅगेच्या आतील गुप्त कप्प्यातून ४ किलो हायब्रिड गांजा आढळून आला. त्यानंतर सीआयडी (क्राईम)च्या मदतीने संबंधित तरुणीला शोधून ताब्यात घेण्यात आलं.
कस्टम विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नितेश्वरी नावाची ही तरुणी पंजाबमधील जालंधरची रहिवासी आहे. ती १३ ऑगस्ट रोजी एअर एशियाच्या विमानाने बँकॉकहून अहमदाबादला पोहोचली होती. विमानतळावर उतरल्यावर तिच्या दोन ट्रॉली बॅगा हरवल्याचं तिने सांगितलं आणि हरवलेला माल शोधण्यासाठी आवश्यक फॉर्म भरून ती निघून गेली.
पुढील तपासासाठी गांजा आणि संबंधित तरुणी कस्टम विभाग व स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणात आणखी कोणती आंतरराष्ट्रीय तस्करीची साखळी कार्यरत आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

