(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील गावडेआंबेरे (हनुमानवाडी) येथे कालवे काढण्यासाठी गेलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. जिलानी जितेंद्र डोर्लेकर (वय ४३, रा. खारवीवाडा) असे या महिलेचे नाव आहे.
मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास त्या घराजवळील खाडीच्या पाण्यात कालवे काढण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी अचानक फिट आल्याने त्या तोल जाऊन खाडीच्या पाण्यात पडल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सकाळी आठच्या सुमारास ही बाब त्यांच्या मुलाच्या निदर्शनास आली. त्याने तातडीने आईला पाण्याबाहेर काढून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद पूर्णगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. तसेच पूर्णगड सागरी पोलीस स्थानकातही बुधवारी याची नोंद घेण्यात आली. या अनपेक्षित दुर्घटनेमुळे गावडेआंबेरे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

