(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षण समितीमार्फत 2025 – 26 चा मालगुंड पंचक्रोशीतील शेतकाऱ्यांसाठी देण्यात येणारा तालुकास्तरीय आदर्श शेतकरी पुरस्कार नुकताच वाटद खंडाळा येथील शेतकरी समीरकुमार संतोष आडाव पाटील यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालयाच्या कै.सदानंद परकर सभागृहामध्ये पार पडला. यावेळी एमटीडीसी चे व्यवस्थापक वैभव पाटील यांच्या हस्ते समीर कुमार संतोष आढाव पाटील यांना सपत्नीक पुरस्कार देण्यात आला.
या पुरस्कर सोहळ्यासाठी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी मेंगाडे उपस्थित होते. तसेच मालगुंड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील ऊर्फ बंधू मयेकर सचिव विनायक राऊत, शाळेचे मुख्याध्यापक बिपिन परकर, मालगुंड शिक्षण संस्थेचे सर्व संचालक, शिक्षक वृंद, निवृत्त कृषी अधिकारी, विलास राणे व मंडळ कृषी अधिकारी प्रदीप भुवड उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या प्रति कृतज्ञता तसेच सन्मान म्हणून देणारा हा पुरस्कार शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणादायी आहे. समीरकुमार आडाव पाटील हे M.Sc. Horticulture तसेच M.A. Political Science व फार्मसिचे विद्यार्थी असून काही काळ नोकरी करून त्यांनी आदर्श शेती करण्याकडे भर दिला असून आधुनिक शेती पद्धतीचा ते अवलंब करत आहेत. फळबाग लागवड शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर, ठिबक सिंचन, जलकुंड, सेंद्रिय शेती, विविध औषधी व मसाल्याची पिके, फळ प्रक्रिया, मधुमक्षिका पालन तसेच विविध शेती विषयक कार्यशाळा प्रशिक्षण शेतकरी अभ्यास दौरे यामध्ये त्यांनी चांगले काम केले आहे. या कामाची पोचपावती म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून विशेष अभिनंदन होत आहे.

