(रत्नागिरी /प्रतिनिधी)
रत्नागिरी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांना शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून नगर अभियंता यतिराज जाधव यांचे प्रथम निलंबन करून त्यानंतर चौकशीअंती बडतर्फ करण्यात यावे, असा ठराव नगरपरिषदेच्या विशेष सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. ही विशेष सभा सोमवारी आयोजित करण्यात आली होती.
सभेच्या प्रारंभी भाजपचे गटनेते राजेश तोडणकर यांनी विषयाचे वाचन करत अभियंत्याचे कथित कृत्य हे लोकप्रतिनिधींच्या अधिकारांवर थेट आक्रमण असल्याचे सांगितले. त्यामुळे संबंधित अभियंत्याला तात्काळ निलंबित करून सखोल चौकशी करावी व दोषी आढळल्यास बडतर्फ करण्यात यावे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. या मागणीला शिंदेसेना, भाजप तसेच उद्धवसेनेच्या नगरसेवकांनीही पाठिंबा दिला.
विशेष सभेच्या सुरुवातीलाच पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी या एकाच विषयावर चर्चा होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर ठरावावर कोणत्याही नगरसेवकांनी वेगळे मत न मांडल्याने ठराव एकमताने मंजूर झाल्याची घोषणा पीठासीन अधिकाऱ्यांनी केली. दरम्यान, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांनी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांनी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी एकोप्याने काम करावे, असे आवाहन केले.
ठराव मंजूर झाल्यानंतर शिंदेसेना गटनेते दत्तात्रय साळवी यांनी यापूर्वी युतीच्या नगरसेवकांनी अभियंत्याविरोधात कारवाईसाठी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या पत्राचे पुढे काय झाले, अशी विचारणा केली. यावर नगरपरिषदेचे अधिकारी जितेंद्र विचारे यांनी मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, त्यावर अभियंत्याचा खुलासा प्राप्त झाल्याची माहिती सभागृहाला दिली.
आरोप एकतर्फी व तथ्यहीन : यतिराज जाधव
दरम्यान, अभियंता यतिराज जाधव यांनी दिलेल्या खुलाशात आपल्यावर लावलेले आरोप एकतर्फी व तथ्यहीन असल्याचे नमूद केले आहे. आपण कोणताही शिस्तभंग केलेला नसून, या घटनेमुळे आपल्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संबंधित दिवशीचे सीसीटीव्ही चित्रीकरण तसेच उपलब्ध पुराव्यांची निष्पक्ष तपासणी करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. या प्रकरणामुळे नगरपरिषदेतील प्रशासकीय व राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

