(खेड / प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील अलसुरे येथे दीड दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली. मंगेश पाटील (रा. भोस्ते पाटीलवाडी) हा युवक जगबुडी नदीच्या पाण्यात बुडाल्याची घटना घडली.
या घटनेची माहिती मिळताच खेड नगरपालिकेचे अग्निशमन दल, विसर्जन कट्टा पथक तसेच खेड रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती; मात्र अपघातग्रस्त युवकाचा पत्ता लागलेला नव्हता. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना काळजीपूर्वक पाण्यात उतरावे, सुरक्षेची साधने वापरावीत याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच शिवसेना उपनेते व माजी आमदार संजय कदम यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. खेड तालुका प्रशासनाकडूनही तातडीने पथके दाखल झाली. उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांसह मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांनीही हजेरी लावून मदतकार्यात समन्वय साधला.
विशेष म्हणजे, मंगेश पाटील यांच्या घरी यंदाच पहिल्यांदा गणपती बाप्पाचे आगमन झाले होते. हा गणपती नवसाचा असल्याची चर्चा गावात सुरू होती. आनंदाच्या वातावरणात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

