(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
तालुक्यातील मिऱ्या येथील प्रलंबित समुद्रबंधाऱ्याच्या कामावरून निर्माण झालेला पेच अखेर सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अर्धवट अवस्थेत थांबलेल्या बंधाऱ्याबाबत जाब विचारण्यासाठी गुरुवारी ग्रामस्थांनी विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने जयस्तंभ येथील पत्तन अभियंता कार्यालयावर धडक देत प्रशासनाला धारेवर धरले. या पार्श्वभूमीवर सहायक अभियंता वीणा पुजारी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत कामातील त्रुटी दूर करून थकीत निधी उपलब्ध झाल्याने बंधारा तातडीने सुरू करण्याचे ठोस आश्वासन देण्यात आले.
मिऱ्या समुद्रकिनाऱ्यावरील धूप रोखण्यासाठी मुरुगवाडा ते पांढरा समुद्र आणि पुढे मिऱ्या परिसरात टेट्रापॉड्स व ग्रोयन पद्धतीचा बंधारा उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र काँक्रीटमधील त्रुटी, दर्जाविषयक शंका आणि अपूर्ण तांत्रिक अंमलबजावणी यामुळे या कामाच्या मजबुतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ग्रामस्थांनी वारंवार निदर्शनास आणून दिलेल्या या बाबींची दखल घेत सहायक अभियंता पुजारी यांनी सर्व काँक्रीट त्रुटी प्राधान्याने दूर करून दर्जा अबाधित ठेवण्याची ग्वाही दिली.
बंधाऱ्याचे काम ठप्प होण्यामागे ठेकेदाराची थकलेली देयके हा मुख्य अडसर असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले. संबंधित ठेकेदाराचे सुमारे आठ कोटी रुपये शासनाकडे प्रलंबित होते. निधीअभावी कामाला ब्रेक लागला होता. या स्थितीवर तोडगा काढण्यासाठी पत्तन विभागाने शासनाकडे २६ कोटी रुपयांची मागणी केली होती. पाठपुराव्यानंतर शासनाने १३ कोटी रुपयांचा निधी वर्ग केल्याने ठेकेदाराची थकीत रक्कम अदा होऊन ९०० मीटर लांबीच्या बंधाऱ्याचे उर्वरित काम विनाविलंब सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
बैठकीत ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत आपल्या सुरक्षेचा मुद्दा ठामपणे मांडला. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर तात्पुरते समाधान व्यक्त करण्यात आले असले, तरी प्रत्यक्ष कामाला केव्हा आणि किती वेगाने सुरुवात होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पावसाळ्यापूर्वी बंधारा पूर्ण न झाल्यास किनारपट्टीलगतच्या वस्त्यांना धोका निर्माण होऊ शकतो, ही भीती व्यक्त होत आहे. निधी उपलब्ध झाल्याने तांत्रिक अडचणी दूर करून कामाला युद्धपातळीवर गती देण्याची हालचाल सुरू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आता आश्वासनांचे कृतीत रूपांतर कितपत होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

