(रत्नागिरी)
जिल्हास्तरीय सर्व यंत्रणा बेघर निवारा केंद्रासाठी, बेघरांसाठी समन्वयाने आपुलकीने निश्चितच काम करेल, असा विश्वास राज्यस्तरीय निवारा सनियंत्रण समितीचे अध्यक्ष उज्ज्वल उके यांनी व्यक्त केला.
रत्नागिरी नगरपरिषद संचलित आठवडा बाजारमधील नवीन आधार नागरी बेघर निवारा केंद्रास राज्यस्तरीय निवारा सनियंत्रण समितीने भेट देवून बैठक घेतली. या बैठकीला सदस्य प्रमिला जरग, महेश कांबळे, सह आयुक्त शंकर गोरे, राज्य अभियान व्यवस्थापक प्रसाद राजेभोसले, रविंद्र जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधिक्षक डॉ. संघमित्रा फुले, मुख्याधिकारी वैभव गारवे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मनोज पाटणकर, आधार शहरस्तर समितीच्या अध्यक्ष जान्हवी जाधव, सचिव शिवानी पवार, परिविक्षा अधिकारी अनिल माळी आदी उपस्थित होते.
अध्यक्ष श्री. उके म्हणाले, नागरी बेघर निवारा केंद्राची इमारत अत्यंत चांगली आहे. ही अशीच ठेवावी त्यासाठी वेळोवेळी आवश्यकतेनुसार देखभाल करावी. रत्नागिरी निसर्गरम्य आहेच. इथल्या माणसांची मनं देखील सुंदर आहेत. सर्वजण चांगले काम करीत आहात. यापुढेही सर्व जिल्हास्तरीय यंत्रणा समन्वयाने, आपुलकीने चांगले काम निश्चितच करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सह आयुक्त श्री. गोरे यांनी समितीच्या कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने समिती स्थापित करण्यात आली आहे. राज्यात 100 नागरी बेघर निवारा केंद्रे उभी राहिली आहेत.14 लहान मुलांसाठी बेघर निवारा झाली आहेत. यामधून केवळ निवारा न देता, त्यांचे जीवनमान चांगले व्हावे, हा सर्वोच्च न्यायालयाचा उद्देश असल्याने समितीमार्फत तसे कामकाज केले जाते.
बैठकीच्या सुरुवातीला समन्वयक संभाजी काटकर यांनी स्वागत तर मुख्याधिकारी श्री. गारवे यांनी प्रास्ताविक केले.