(रत्नागिरी)
रत्नागिरी शहराजवळील कर्ला–मारुती मंदिर रस्त्यालगत संशयास्पदरीत्या लपून बसलेल्या दोघांविरुद्ध शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने हे दोघे तिथे थांबले असल्याचा संशय पोलिसांना आला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस हवालदार प्रशांत कल्लप्पा पाटील (वय ३८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी रात्री गस्तीवेळी कर्ला गावाजवळील एका पानटपरीच्या आडोशाला दोन व्यक्ती लपून बसलेले दिसले. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांची हालचाल संशयास्पद असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.
संशयितांची नावे रउफ इक्बाल डोंगरकर (वय ३६, रा. उद्यमनगर जामा मशिदीजवळ) आणि मोहफीस यासीन सोलकर (वय ३०, रा. नवीन कर्ला) अशी आहेत. या दोघांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा कलम १२२(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.

