(रत्नागिरी / प्रतिनिधी)
वातावरणातील सतत होणाऱ्या बदलांचा फटका यंदा आंबा हंगामाला बसला असून, उत्पादनात मोठी घट झाली आहे. अवकाळी पाऊस, तापमानातील चढ-उतार आणि वाढती उष्णता यामुळे यंदा अवघे १५ ते २० टक्केच उत्पादन हाती आले आहे. मात्र, उष्णतेचा पारा चढल्याने झाडावरील आंबा अपेक्षेपेक्षा लवकर तयार होऊ लागला असून, बाजारात अचानक आवक वाढल्याने दर कोसळले आहेत. परिणामी आधीच उत्पादन घटले असताना दरातील घसरणीने बागायतदारांची चिंता अधिकच वाढली आहे.
मार्च महिन्यापासून आंब्याची बाजारपेठेत आवक सुरू झाली होती. सुरुवातीला हापूसला पेटीमागे ६ हजार ते १२ हजार रुपयांपर्यंत दर मिळत होता. मात्र, गेल्या काही दिवसांत आवक झपाट्याने वाढली. उष्णतेमुळे आंबा लवकर पक्व झाल्याने बागायतदारांनी घाईघाईने तोडणी सुरू केली. परिणामी केवळ चार ते पाच दिवसांतच सुमारे ७० ते ८० हजार पेट्या विक्रीसाठी बाजारात दाखल झाल्या. याचा थेट परिणाम दरावर होत, तो घसरून अवघा १,२०० ते २,५०० रुपयांवर आला.
कोकणासह कर्नाटक, गुजरात, केरळ, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश या राज्यांतूनही आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. कोकणातून सुमारे ५० ते ५५ हजार पेट्या, तर इतर राज्यांतून २७ ते ३० हजार पेट्या बाजारात येत असल्याने स्पर्धा वाढली आहे. हापूसची विक्री डझनावर होत असताना, बाहेरील राज्यांतील आंबा किलोच्या दराने विकला जात असल्याने बाजारातील समतोल ढासळत आहे.
दरम्यान, स्थानिक बाजारपेठेतही दर घसरले आहेत. रत्नागिरीत हापूस आंबा ५०० ते १,२०० रुपये डझन, तर पायरी आंबा ८०० ते १,००० रुपयांदरम्यान विकला जात आहे. मागील आठवड्याभरात आवक लक्षणीय वाढल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. दर गडगडल्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद मात्र वाढला आहे. तुलनेने कमी दरात आंबा उपलब्ध होत असल्याने खरेदीत वाढ झाली असली, तरी सर्वसामान्यांसाठी आंबा अद्यापही पूर्णपणे परवडणारा झालेला नाही. एकीकडे उत्पादन घट आणि दुसरीकडे दरातील घसरण, या दुहेरी संकटामुळे बागायतदारांचे आर्थिक गणित विस्कटले असून, यंदाचा हंगाम त्यांच्यासाठी चिंतेचा ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

