(रत्नागिरी)
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे हिरक महोत्सवी, कोकण विभाग ग्रंथालय संघाचे 27 वे आणि रत्नागिरी ग्रंथालय संघाचे 49 वे वार्षिक अधिवेशन दिनांक 21 व 22 फेब्रुवारी 2026 रोजी रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ आणि स्व. आमदार कुसुमताई अभ्यंकर ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने बालाजी मंगल कार्यालय शांतीनगर – नाचणे, तालुका – जिल्हा रत्नागिरी येथे मोठ्या दिमाखात पार पडले.
या तिहेरी अधिवेशनाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. याआधी पहिल्या दिवशी म्हणजे दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 8.30 वा. साई मंदिर ते अधिवेशन स्थळ दरम्यान ढोल ताशांच्या गजरात आणि ग्रंथालय चळवळीच्या जय घोषात प्रचंड उत्साहात ग्रंथदिंडीने या अधिवेशनाची सुरुवात झाली.

यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि राज्य ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष, आमदार गंगाधर पटने आणि ज्ञात – अज्ञातांना श्रद्धांजली अर्पण करुन सकाळी 11 वा. राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार यांच्या शुभहस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले. यावेळी स्वागताध्यक्ष – मरिनर दिलीप भाटकर (संपादक कोकणशिल्प) यांनी सर्वांचे स्वागत केले. साहित्यिक कृष्णाजी कुलकर्णी व संतसाहित्य आणि ग्रंथालय चळवळीचे अभ्यासक धनंजय चितळे यांचे यानिमित्ताने उद्घाटन समारंभात मार्गदर्शन लाभले.
यावेळी राज्याचे ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, कोकण विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक प्रशांत पाटील, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष गुलाबराव पाटील, प्रमुख कार्यवाह सोपानराव पवार, कार्य उपाध्यक्ष ग्रंथमित्र राम मेकले, कोषाध्यक्ष भीमराव पाटील, कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष दिलीप कोरे, ग्रंथालय कर्मचारी प्रतिनिधी ग्रंथमित्र नंदू बनसोड यांची मंचावर उपस्थिती लाभली. या उद्घाटन समारंभामध्ये प्रास्ताविक रवींद्रकुमार तथा भाई कालेकर यांनी तर सूत्रसंचालन अंजली बर्वे यांनी केले.
पालकमंत्री उदय सामंत यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे केले मार्गदर्शन…
उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत हे बाहेरगावी असल्याने त्यांनी या अधिवेशनाला दुरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी पालकमंत्री या नात्याने त्यांनी राज्यभरातील उपस्थित ग्रंथालय प्रतिनिधींचे स्वागत केले. आणि शासन भविष्यात ग्रंथालयांबाबत अनेक चांगले निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
जिल्हा ग्रंथालय संघाचे पुरस्कार प्रदान
यावेळी रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे जाहीर झालेले पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आले. यामध्ये गुलाबराव पाटील यांना राज्यस्तरीय विशेष पुरस्कार, श्री शिंगेश्वर वाचनालय, शिरशिंगे दापोली या ग्रंथालयाला उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार, कमलेशा मुसलोणकर, दापोली यांना उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार तर राजापूरच्या पद्मजा कारेकर यांना उत्कृष्ट ग्रंथालय सेवक पुरस्कार त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिल्या गेलेल्या पुरस्कार विजेत्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
वेगवेगळ्या परिसंवाद आणि चर्चासत्रात झाले विचार मंथन
या दोन दिवशीय अधिवेशनात अनेक विषयावर वेगवेगळी सत्र पार पडली. यामध्ये सार्वजनिक ग्रंथालयाची आत्मनिर्भरता या विषयावर पहिला परिसंवाद दिलीप कोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यात ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष चांगदेव काळे, ग्रंथमित्र समितीचे माजी सदस्य ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, ग्रंथमित्र नईमखान पठाण नाशिक व अरविंद कुलकर्णी देवरुख यांनी आपले विचार मांडले.
मराठवाडा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमित्र खंडेराव सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक ग्रंथालयांचे संगणकीकरण या विषयावर झालेल्या परिसंवादात रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे ग्रंथालय निरीक्षक हेमंत काळोखे व आबासाहेब कल्याणकर यांनी मार्गदर्शन केले, पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष सोपानराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथालयाने अनुदान व्यतिरिक्त उत्पन्नाची साधने कशी वाढवावीत? या विषयावर चर्चासत्र झाले. यात अमरावती विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रभाकर घुगे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर आनंदी जिवनाच्या वाटा यामध्ये वक्ते अॕड प्रा. राम श्यामराव हरपाळे यांनी खूप सुंदर असे व्याख्यान दिले, पुणे ग्रंथालय संघाचे संचालक रमेश सुतार यांच्या अध्यक्षतेखाली ‘रत्नागिरीतील शताब्दी ग्रंथालये’ या विषयावरील चर्चासत्रात नगर वाचनालय राजापूरचे जयंत अभ्यंकर आणि सद्गुरु वाचनालय देवरुखचे गजानन जोशी यांचा सहभाग होता. त्यानंतर नागपूर विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शिवकुमार शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ‘ग्रंथालय चळवळीचा मुळाधार – ग्रंथालय सेवक’ यामध्ये सिंधुदुर्ग ग्रंथालय संघाचे सदस्य संजय शिंदे, कर्मचारी नेते नंदू बनसोड, रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक राकेश आंबेरकर आणि कोलगाव मुक्तदार ग्रंथालयाच्या ग्रंथपाल पूनम नाईक यांनी आपले विचार मांडले.
अनेक पुस्तके प्रकाशित करण्यात आली
रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाचे मुखपत्र असलेल्या त्रैमासिक “कुसुमधन” या बरोबरच राज्यातील अनेक लेखकांची यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुस्तके प्रकाशित करण्यात आली.
यावेळी रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाची सर्वसाधारण सभा, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ, कोकण विभाग ग्रंथालय संघाच्या कार्यकारी मंडळ आणि नियामक मंडळाच्या सभा मोठ्या उत्साहात पार पडल्या.
करमणुकीचे कार्यक्रम
ग्रंथालयीन कर्मचारी आणि कार्यकर्ते यांच्या करमणुकीसाठी गायिका मयुरा डोमणे आणि सहकलाकारांचा अभिजात मराठी भावगीतांचा ‘गंध फुलांचा’ हा सुमधुर कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये अनेक मराठी गीतांचा नजराणा सादर करण्यात आला. यावेळी कोळीगीतेही सादर करण्यात आली. यावर अनेकांनी ठेकाही धरला.
खुले अधिवेशन
त्यानंतर डाॕ. गजानन कोटेवार यांच्या अध्यक्षतेखाली खुले अधिवेशन पार पडले. यामध्ये ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर तसेच प्रशांत पाटील, डाॕ. राजेश पाटील, रामदास साठे, सुनिल हुसे, स. र. जोपुळे, शंशाक नाईक आणि हेमंत काळोखे हे अधिकारी वर्ग सहभागी होवून उपस्थितांच्या प्रश्नांना खूप छान आणि सखोल असे उत्तरे दिली व मार्गदर्शन केले. यावेळी ग्रंथालय संचालक (महाराष्ट्र राज्य) अशोक गाडेकर यांनी आपल्या शैलीने सर्वांची मने जिंकून घेतली. यानंतर अधिवेशनाचा समारोप करण्यात आला. अशा प्रकारचा दोन दिवसाचा भरगच्च असा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी या अधिवेशनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या ग्रंथालय प्रतिनिधींना दोन्ही दिवस चहा, नाष्टा, सुग्रास भोजन, निवास यांची छान व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली होती.
संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन राकेश आंबेरकर त्याचबरोबर श्रीकांत पाटील आणि महेद्र दळवी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डाॕ. गजानन कोटेवार, तसेच रविंद्रभाई कालेकर आणि कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष दिलीप कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा ग्रंथालयाचे संभाजी सावंत, महेंद्र दळवी, श्रीकांत पाटील, राकेश आंबेरकर, विश्वनाथ बापट, विजय कालेकर, रोशनी सावंत, रुपेश्री पवार, सिद्धी पाथरे, श्रद्धा सुर्वे, अंतरा रहाटे, शर्मिला बांदिवडेकर, वैष्णवी बोरसुतकर, सेजल मावळंकर, पूजा सनगरे, अर्चना राणे, अमृता इंदुलकर, समीक्षा पंडित, कोमल चांदे, ऐश्वर्या भोसले आणि रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रंथालय कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी अधिक मेहनत घेतली. ग्रंथालय अधिवेशन उत्तमरित्या पार पाडल्याने आयोजकांवर राज्यभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

