(रत्नागिरी /प्रतिनिधी)
तालुक्यातील करबुडे ते निवळी असा प्रवास करत असताना गणपतीपुळे रस्त्यावर मासेगाव गोडाऊन बसथांब्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात घडला. दुचाकीवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन कोसळली. या अपघातात चालकासह मागे बसलेल्या तरुणास गंभीर दुखापत झाली आहे.
ही घटना सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतीस धाव घेतली. जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज नाणीज धाम, हातखंबा येथील रुग्णवाहिकेच्या साहाय्याने दोन्ही जखमींना तत्काळ अपघातस्थळावरून रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या अपघातात पांडुरंग भिकाजी पातये (वय ६५) आणि साहिल गणेश कुळये (वय १९, दोघेही रा. मु.पो. जांभरूण, ता. जि. रत्नागिरी) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

