(देवरुख / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील साडवली गावच्या कन्या आणि त्वचारोगतज्ज्ञ डॉ. नेहा प्रल्हाद देवकर यांनी आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान, कौशल्य आणि अनुभवाच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जागतिक स्तरावर ख्याती असलेल्या आणि भारतातील आघाडीच्या महिला मासिकांपैकी एक असलेल्या ‘फेमिना’ मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकण्याचा मान त्यांना मिळाला आहे. त्यांच्या या यशामुळे साडवलीसह देवरुख आणि संपूर्ण संगमेश्वर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
साडवली गावचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रल्हाद नारायण देवकर यांच्या त्या कन्या आहेत. डॉ. नेहा देवकर यांनी त्वचारोगशास्त्रात एम.डी. पदवी संपादन केली असून, वैद्यकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. देशातील अत्यंत विश्वासार्ह त्वचारोगतज्ज्ञांपैकी एक म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे देवकर कुटुंबीयांसह साडवली गावाचा आणि संगमेश्वर तालुक्याचा नावलौकिक वाढला आहे.
ग्रामीण भागातून पुढे येत वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधणे आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित मासिकाच्या मुखपृष्ठावर स्थान मिळवणे ही निश्चितच अभिमानास्पद कामगिरी आहे. डॉ. नेहा देवकर यांच्या यशामुळे गावातील तरुणाईला, विशेषतः मुलींना शिक्षण, जिद्द आणि कर्तृत्वाच्या जोरावर यशाची नवी शिखरे गाठण्याची प्रेरणा मिळणार आहे.
त्यांच्या या यशाबद्दल साडवली ग्रामस्थांसह संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील वैद्यकीय वाटचालीसाठी आणि उत्तरोत्तर यशासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत. डॉ. नेहा देवकर यांचे हे यश साडवली गावासाठी अभिमानाची आणि प्रेरणेची बाब ठरले आहे.


