(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुंबई–गोवा महामार्गावरील हातखंबा येथील गुरववाडी परिसरात आज (गुरुवारी) सकाळी केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात टँकर चालक जखमी झाला असला तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातानंतर तत्काळ मदत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला.
गोवा येथून मुंबईच्या दिशेने निघालेला टँकर (क्र. MH-43-CK-9651) हातखंबा गुरववाडी येथे सकाळी सुमारे ७.२२ वाजण्याच्या सुमारास चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन पलटी झाला. या अपघातात चालक चंद्रजीत वर्मा (वय ४३, रा. उत्तर प्रदेश) याच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु श्री नरेंद्राचार्य महाराज संस्था, हातखंबा यांच्या २४ तास सेवेत असलेल्या ॲम्बुलन्सने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मागोमाग मो. वा. निरीक्षक सुदेश कंदकुर्तीकर, केतन पाटील आदी घटनास्थळी धाव घेत जखमी चालकाला त्वरित मदत करून त्याला रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, टँकर पलटी झाल्यामुळे काही काळ परिसरात गर्दी झाली होती. स्थानिक नागरिक व मदत पथकाच्या सहकार्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

