(संगमेश्वर/ वार्ताहर)
संगमेश्वर तालुक्यातील देवळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ समितीची सभा आज (शनिवार, दिनांक ७) रोजी देवळे ग्रामपंचायतीमध्ये संपन्न झाली. या सभेत अभियानांतर्गत दर महिन्याला राबविण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक उपक्रमांचा आढावा घेऊन आगामी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. तसेच आरोग्यमंत्री आबिटकर यांच्या जनसंवाद यात्रेच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष चर्चा करण्यात आली.
सभेत जननी शिशु सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आयुष्मान गोल्डन कार्ड, आभा कार्ड, वयश्री योजना, टी.बी.मुक्त ग्रामपंचायत, ॲनिमिया मुक्त भारत आणि एच.पी.व्ही. लसीकरण जनजागृती या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासह आगामी उपक्रम प्रभावीपणे राबविण्याबाबत नियोजन करण्यात आले.
या सभेला ज्येष्ठ पत्रकार व समिती सदस्य प्रकाश चाळके, पोलीस पाटील विजीत साळवी, चंद्रकांत जाधव, प्रदीपा साळवी, दर्शन साळवी, सुहासिनी सरदेशपांडे, प्रभोध आठल्ये, प्रभाकर साळवी, बाळाशेठ परशेटये, समुदाय आरोग्य अधिकारी सोनाली पाटील, संगीता सावंत, सुनील जाधव आदी उपस्थित होते.
सभेचे सूत्रसंचालन व नियोजन देवळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक प्रशांत कांबळे यांनी केले.


