(रत्नागिरी / प्रतिनिधी)
रत्नागिरी शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांमुळे पार्किंगचा प्रश्न अधिकच गंभीर होत चालला आहे. विशेषतः बाजारपेठ व गर्दीच्या परिसरात वाहन कुठे उभी करावी, हा प्रश्न वाहनचालकांना सतावत आहे.
शहरातील रस्ते अरुंद असून आराखड्यानुसार त्यांचे रुंदीकरण झालेले नाही. गाडीतळ–गोखलेनाका मार्गे मारुतीआळी हा रस्ता रुंदावण्यात प्रशासनाला अपयश आल्याने वाहतूक कोंडी सततची डोकेदुखी ठरली आहे. या परिसरात नागरिक आपापल्या गाड्या रस्त्यालगत उभ्या करतात. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.वाहतूक पोलिस मात्र मुख्यत्वे बाहेरून येणाऱ्या गाड्यांवर दंडात्मक कारवाई करतात. पण स्थानिक नागरिकांच्या गाड्यांमुळेच खरी वाहतूक कोंडी होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या तक्रारी कानी पडतात.
पार्किंग व्यवस्थापनात होत असलेल्या या विसंगतीमुळे बाजारपेठेतील गोंधळ दिवसेंदिवस वाढत असून, वाहनचालकांसोबत पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शहरातील वाढत्या वाहतूक समस्येवर ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.


