(संगमेश्वर / एजाज पटेल)
सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींची गांभीर्याने दखल घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करणारे अधिकारी प्रशासनात असणे महत्त्वाचे आहे. याचा प्रत्यय संगमेश्वर एसटी बसस्थानकातील डिजिटल माहिती फलकांच्या समस्येवरून आला आहे. लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या फलकांवर बसच्या वेळापत्रकाऐवजी रिकाम्या स्क्रीन दिसणे, व्यावसायिक जाहिरातींचा कर्णकर्कश आवाज सुरू असणे, तीन दिवसांपूर्वीची तारीख झळकणे, तसेच दोन फलकांवर वेगवेगळ्या वेळा दाखविल्या जाणे, अशा प्रकारांमुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. या समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर विभागीय अधिकारी अश्वजीत जानराव यांनी अवघ्या काही तासांतच त्याची दखल घेत संबंधित त्रुटी दूर करण्यासाठी कार्यवाही केली. त्यांच्या या तत्परतेचे भाजपचे संगमेश्वर तालुकाध्यक्ष मिथुन निकम यांनी कौतुक केले आहे.
संगमेश्वर एसटी बसस्थानकात प्रवाशांना बसच्या आगमन आणि प्रस्थानाची माहिती सहज उपलब्ध व्हावी, कोणती बस कोणत्या मार्गावर जाणार आहे आणि तिची निर्धारित वेळ काय आहे, हे समजावे, या उद्देशाने डिजिटल माहिती फलक बसविण्यात आले आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या सुविधेचा अपेक्षित लाभ प्रवाशांना मिळत नसल्याचे चित्र होते. अनेकदा फलकांवरील स्क्रीन रिकाम्या दिसत होत्या, तर काही वेळा बसच्या वेळापत्रकाऐवजी व्यावसायिक जाहिरातीच प्रदर्शित केल्या जात होत्या. त्यात जाहिरातींच्या मोठ्या आवाजामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता.
डिजिटल फलकांवरील तारीख आणि वेळेतील विसंगतीमुळे प्रवाशांच्या संभ्रमात आणखी भर पडत होती. प्रत्यक्ष तारखेऐवजी तीन दिवसांपूर्वीची तारीख दाखवली जात होती. विशेष म्हणजे, एकाच बसस्थानकातील दोन फलकांवर दोन वेगवेगळ्या वेळा दिसत असल्याने बसच्या वेळेबाबत अचूक माहिती मिळणे कठीण झाले होते. प्रवाशांच्या सोयीसाठी लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या सुविधेची अशी अवस्था झाल्याने या व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
या प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर विभागीय अधिकारी अश्वजीत जानराव यांनी तातडीने लक्ष घातले. समस्येची केवळ माहिती घेऊन न थांबता संबंधित त्रुटी दूर करण्यासाठी त्यांनी आवश्यक कार्यवाही केली. विशेष म्हणजे, अवघ्या काही तासांत डिजिटल माहिती फलक पुन्हा व्यवस्थित कार्यान्वित झाल्याचे दिसून आले. प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन इतक्या कमी वेळेत समस्या सोडविल्याने जानराव यांच्या कार्यतत्परतेचे कौतुक होत आहे.
भाजपचे संगमेश्वर तालुकाध्यक्ष मिथुन निकम यांनीही या कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “अधिकारी असावा तर अश्वजीत जानराव यांच्यासारखा. सर्वसामान्य प्रवाशांच्या समस्यांची तत्परतेने दखल घेणारा, त्यांचे फोन स्वतः रिसिव्ह करून अडचणी समजून घेणारा आणि त्यावर त्वरित कार्यवाही करणारा अधिकारी खऱ्या अर्थाने जनतेच्या उपयोगी पडतो. संगमेश्वर एसटी स्थानकातील डिजिटल फलकांच्या गैरव्यवस्थापनाबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची त्यांनी अवघ्या काही तासांत दखल घेत समस्या मार्गी लावली, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. पदाचा रुबाब न दाखवता सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी सोडवण्याची त्यांची कार्यपद्धती प्रशंसनीय आहे. अशा तत्पर अधिकाऱ्यांमुळेच प्रशासनाविषयी जनतेचा विश्वास वाढतो.”
दरम्यान, डिजिटल फलकांवरील त्रुटी दूर झाल्यामुळे संगमेश्वर एसटी स्थानकातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मात्र, ही सुविधा भविष्यातही नियमित आणि अचूकपणे सुरू राहणे आवश्यक आहे. फलकांवर बसच्या वेळापत्रकाला प्राधान्य देणे, तारीख व वेळेची अचूक नोंद ठेवणे आणि व्यावसायिक जाहिरातींच्या आवाजावर नियंत्रण राखणे, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. एखाद्या समस्येची वेळीच दखल घेऊन तातडीने निराकरण करता येते, हे विभागीय अधिकारी अश्वजीत जानराव यांच्या कार्यवाहीतून अधोरेखित झाले आहे.


