(रत्नागिरी)
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या राज्यस्तरीय नाट्यपरिषद एकांकिका करंडक स्पर्धेत महाराजा फाउंडेशन पुरस्कृत गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरीच्या बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स विभागातर्फे आणि माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने सादर करण्यात आलेल्या “कॉफीन” या एकांकिकेने थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.
चिन्मय सरपोतदार लिखित आणि वेदांग सौंदलेकर दिग्दर्शित या एकांकिकेत सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या शिक्षण व करिअरबद्दल असणाऱ्या अवास्तव अपेक्षा आणि परदेशी जाण्याच्या हव्यासामुळे निर्माण होणारा ताण प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. या दबावाखाली मुलं जिवंत असूनही जणू मृत्यूसमान आयुष्य जगतात, हा वास्तववादी संदेश कॉफीन (शवपेटी) या प्रतीकातून लोकगीतांच्या माध्यमातून प्रभावीपणे रंगमंचावर उतरवण्यात आला.
१६ ते १७ कलाकारांच्या उत्तम अभिनयाने सजलेली ही एकांकिका परीक्षकांच्या मनाला भिडली. परीक्षक श्री. आशीर्वाद मराठे आणि श्रीमती मराठे यांनी केलेल्या सखोल परीक्षणातून कॉफीनला अंतिम फेरीत स्थान मिळालं.
रत्नागिरी केंद्रावर एकूण नऊ एकांकिका नोंदवण्यात आल्या असून त्यापैकी आठ एकांकिकांचं सादरीकरण झालं. या स्पर्धेचं आयोजन अखिल भारतीय नाट्य परिषद रत्नागिरी शाखेचे कार्यवाहक व केंद्रप्रमुख श्री. समीर इंदुलकर, समन्वयक डॉ. आनंद आंबेकर, श्री. सुनील बेंडखळे आणि कार्यकारिणी सदस्यांच्या सहकार्यातून करण्यात आलं.
एकांकिकेच्या यशानंतर अनेक ज्येष्ठ नाट्यकर्मी मार्गदर्शनासाठी पुढे सरसावले असून लवकरच विशेष प्रयोगाचं आयोजन होणार आहे. यशस्वी पुढील वाटचालीसाठी महाराजा फाउंडेशनचे अध्यक्ष ऍड. सुजित कीर आणि त्यांचे मित्रमंडळ, तसेच गोगटे कॉलेजचे प्राचार्य डॉ. मकरंद साखरकर, शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

