(संगमेश्वर / रत्नागिरी)
वृद्धापकाळात मायेची ऊब, प्रेम आणि आधाराची अपेक्षा असताना मारहाणीचे घाव सोसाव्या लागलेल्या नायरी (ता. संगमेश्वर) येथील ९१ वर्षीय जलेखा इसाक मोडक यांची अखेर मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. सुनेने लाकडी दांडक्याने आणि हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याच्या कथित घटनेत गंभीर जखमी झालेल्या जलेखा मोडक यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने नायरी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वृद्धांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ५.३० वाजण्याच्या सुमारास नायरी येथील राहत्या घरी जलेखा इसाक मोडक (वय ९१) यांना मारहाण झाल्याची तक्रार करण्यात आली होती. वृद्ध सासूची देखभाल करावी लागत असल्याने तसेच त्यांच्यामुळे बाहेर फिरायला जाता येत नसल्याच्या कारणावरून सून नाशिरा अस्लम मोडक हिने लाकडी दांडक्याने आणि हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. या मारहाणीत जलेखा मोडक यांच्या उजव्या गुडघ्याला, डाव्या पायाला तसेच उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. याप्रकरणी वृद्धेची मुलगी जैबुनिसा निजामुद्दीन लांबे (वय ६०, रा. नेरूळ, नवी मुंबई) यांनी पनवेल पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार नाशिरा मोडक हिच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या जलेखा मोडक यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूने या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले असून, मृतदेह अंत्यविधीसाठी नायरी येथे आणण्यात येणार असल्याची माहिती आहे. जलेखा मोडक यांच्या मृत्यूचा मारहाणीत झालेल्या दुखापतींशी वैद्यकीयदृष्ट्या संबंध आहे का, हा आता या प्रकरणातील महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यास मदत होणार असून, त्यानुसार पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वैद्यकीय अहवाल आणि पोलिस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वृद्धांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर!
आयुष्याच्या संध्याकाळी वृद्धांना कुटुंबीयांच्या प्रेमाची, मायेची आणि सुरक्षिततेची सर्वाधिक गरज असते. अशा संवेदनशील वयात मारहाणीला सामोरे जावे लागल्याचा आरोप आणि त्यानंतर झालेला मृत्यू ही मन सुन्न करणारी घटना आहे. वृद्धांना सन्मानाने आणि सुरक्षित वातावरणात जगता यावे, ही अपेक्षा असताना नायरीतील या घटनेने कौटुंबिक नात्यांमधील माणुसकीचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट होणार असून, सुनेवरील आरोप आणि पुढील कायदेशीर कारवाईबाबत पोलिस तपास महत्त्वाचा ठरणार आहे.


