(पालघर)
विरारच्या नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंटचा मागील भाग कोसळून भीषण दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत २४ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले असून, त्यापैकी १५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर नऊ जण गंभीर जखमी आहेत. मागील ३६ तासांपासून राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (NDRF) आणि वसई- विरार महापालिकेचे अग्निशमन दल सलग बचावकार्य करत आहेत.
बुधवारी सायंकाळपर्यंत १५ जणांना बाहेर काढण्यात आले होते, तर आज (गुरुवार) सकाळपर्यंत आणखी नऊ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. अजूनही काही कुटुंबीय अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाने सांगितले की, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून लवकरच उर्वरित नागरिकांनाही सुरक्षित बाहेर काढले जाईल.

मृतांची यादी
आरोही जोईल (२४), उत्कर्षा जोईल (१), लक्ष्मण किसकू सिंग (२६), दिनेश सकपाळ (४३), सुप्रिया निवळकर (३८), पार्वती सकपाळ (६०), दीपेश सोनी (४१), सचिन नेवाळकर (४०), हरीश सिंग बिष्ट (३४), सोनाली तेजाम (४१), कशिश पवन सहेनी (३५), शुभांगी पवन सहेनी (४०), गोविंद सिंग रावत (२८), दीपक सिंग बोहरा (२५).
जखमींची यादी
संजय सिंग (२४), मिताली परमार (२८), प्रदीप कदम (४०), जयश्री कदम (३३), विशाखा जोईल (२४), मंथन शिंदे (१९), प्रभाकर शिंदे (५७), प्रमिला शिंदे (५०), प्रेरणा शिंदे (२०).
सर्व जखमींवर वसई-विरारमधील शासकीय व खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
एका वर्षाच्या चिमुकलीचा वाढदिवस सुरू असताना दुर्घटना घडली
त्या रात्री जोईल कुटुंबात आनंदाचं वातावरण होते. उत्कर्षा चा पहिला वाढदिवस होता. एकीकडे मुलीचा पहिल्या वाढदिवसाची धामधूम तर, दुसरीकडे राज्यात गणेश आगमनासाठी लोकांची जोरदार तयारी होती. मात्र रात्रीच्या सुमारास काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. क्षणात चार मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. या अपघातात जोईल कुटुंबातील दोघींचा मृत्यू झाला. इमारत कोसळण्यापूर्वी चौथ्या मजल्यावर या एका वर्षाच्या चिमुकलीचा बर्थ डे कार्यक्रम सुरू होता.
दुर्घटनेनंतर अंधेरी येथून एन.डी.आर.एफ.ची अतिरिक्त तुकडी घटनास्थळी दाखल आहे. अग्निशमन दल, स्थानिक पोलीस व महानगरपालिका यंत्रणांच्या मदतीने मलबा हटवण्याचे काम सुरू अद्यापही आहे. मलब्यात अजूनही काही जण अडकले असण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या दृष्टीने रमाबाई अपार्टमेंट शेजारील ४ मजली इमारत व आजूबाजूच्या चाळी रिकाम्या करून रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. प्रभावित नागरिकांसाठी समाज मंदिरात तात्पुरते निवारा शिबीर उभारण्यात आले असून, जेवणाची तसेच आवश्यक सुविधाची व्यवस्था करण्यात आली आहे.

