(रत्नागिरी)
‘शिपायापासून थेट साहेबांपर्यंत लाच द्यावी लागते’, अशी संतापजनक परिस्थिती रत्नागिरीत उघड झाली आहे. स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयाच्या अहवालात फेरफार करण्यासाठी तब्बल २४ हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला. अखेरीस १६,५०० रुपयांवर सौदा ठरला आणि ही रक्कम स्वीकारताना सहाय्यक संचालक, सहाय्यक लेखाधिकारी आणि कंत्राटी शिपाई असे तिघे सरकारी कर्मचारी एसीबीच्या सापळ्यात रंगेहात पकडले गेले.
दापोली पंचायत समितीचे २०२०–२१ आणि २०२१–२२ या वर्षांचे लेखापरीक्षण पूर्ण झाल्यानंतर अनुपालन अहवाल सादर करण्यात आला होता. तरीदेखील अंतिम अहवाल (एफआर) देण्यासाठी २४ हजारांची मागणी करण्यात आली. तक्रारदाराने तत्काळ अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार दाखल केली आणि ११ सप्टेंबर रोजी पडताळणीनंतर सापळा रचण्यात आला. सतेज शांताराम घवाळी (कंत्राटी शिपाई) यांनी तक्रारदाराकडून १६,५०० रुपये स्वीकारून ती रक्कम सिद्धार्थ विजय शेट्ये (सहाय्यक लेखाधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी) यांच्याकडे दिली. ही कारवाई शरद रघुनाथ जाधव (सहाय्यक संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालय रत्नागिरी) यांच्या संमतीने होत असल्याचे स्पष्ट झाले. संध्याकाळी ७.४६ वाजता पंचांसमक्ष तिघांनाही रंगेहात पकडण्यात आले.
या तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कलम ७(अ) व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलीस निरीक्षक सुहास रोकडे यांच्या पथकाने केली. पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी तर ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे आणि सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबवण्यात आली.
सरकारवर थेट रोष
या घटनेने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून सरकारी यंत्रणांतील भ्रष्टाचाराचे लोण किती खोलवर गेले आहे, हे यातून स्पष्ट होत आहे. ‘सरकारी अहवालालाही किंमत असते, क्लिन चिट पैशांनी विकत घेता येते’, हा संदेश थेट जनतेपर्यंत पोचल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण होत आहे. जनतेच्या पैशावर चालणाऱ्या कार्यालयातच अशी लाचखोरी सुरू असल्याने सरकारच्या भ्रष्टाचारविरोधी दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिकांना एसीबीचे आवाहन
दरम्यान, अँटी करप्शन ब्युरोने नागरिकांना आवाहन केले आहे की, शासकीय अधिकारी-कर्मचारी किंवा त्यांचे एजंट यांच्याकडून कोणतीही लाच मागणी होत असल्यास त्वरित दुरध्वनी ०२३५२–२२२८९३ किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

