(नवी दिल्ली)
केंद्र सरकारने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ ३० मे २०२६ पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत (यापैकी जे आधी असेल) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार, ते सीडीएस पदासह लष्करी व्यवहार विभागाचे (डीएमए) सचिव म्हणूनही कार्यरत राहतील.
जनरल अनिल चौहान – अनुभव आणि कारकीर्द
जनरल चौहान यांनी १९८१ मध्ये भारतीय सैन्यात प्रवेश केला. निवृत्तीनंतर ते राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत होते. देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे डिसेंबर २०२१ मध्ये अपघातात निधन झाले. त्यानंतर सरकारने सीडीएस पदासाठी पात्रतेच्या निकषांमध्ये बदल केले, ज्यामुळे लेफ्टनंट जनरल पदावरून निवृत्त अधिकारी ही पात्र ठरले. जनरल चौहान यांची सीडीएस पदावर नियुक्ती ३० सप्टेंबर २०२२ रोजी झाली होती आणि आता त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे.
थिएटर कमांडवर प्रश्न आणि चर्चा
सीडीएस म्हणून जनरल चौहान यांच्यासमोरील पहिले मोठे काम होते थिएटर कमांड स्थापन करणे. मात्र, अद्याप ही कमांड प्रत्यक्षात आलेली नाही. ऑपरेशन सिंदूरनंतर थिएटर कमांडच्या गरजेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनी म्हटले की सध्या खालच्या स्तरावर नवीन संरचनेसाठी गरज नाही, तर भारतीय सेनाप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी थिएटर कमांडची आवश्यकता अधोरेखित केली आहे.
इंटिग्रेटेड थिएटर कमांडवर काम सुरू
सध्या भारतीय सेनेत ७, हवाई दलात ७ आणि नौदलात ३ कमांड आहेत. या सर्वांना एकत्र करून इंटिग्रेटेड थिएटर कमांड स्थापन करण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया जनरल बिपिन रावत यांच्या नियुक्तीपासून जानेवारी २०२० मध्ये सुरू झाली होती. जनरल चौहान यांनी ३० सप्टेंबर २०२२ रोजी सीडीएस पद स्वीकारल्यानंतर या नव्या प्रस्तावावर काम सुरू केले. सध्याच्या प्रस्तावानुसार, पाकिस्तान सीमेसाठी एक, चीन सीमेसाठी एक, मेरीटाइम कमांडसाठी एक अशा तीन थिएटर कमांड स्थापन होणार आहेत.

