(नाशिक)
आज प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकमध्ये आयोजित ध्वजवंदनाच्या कार्यक्रमात अनपेक्षित गोंधळ उडाला. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न झाल्याने वनविभागातील महिला कर्मचारी माधवी जाधव यांनी थेट मंत्र्यांना जाब विचारला. या घटनेनंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
नेमके काय घडले?
आज २६ जानेवारी २०२६ रोजी नाशिकमध्ये झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात गिरीश महाजन भाषण करत असताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही. हे लक्षात येताच वनविभागात कार्यरत असलेल्या माधवी जाधव यांनी सार्वजनिकपणे यावर आक्षेप नोंदवला. “संविधानाचे शिल्पकार असलेल्या बाबासाहेबांचे नाव प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात का घेतले नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यानंतर कार्यक्रमस्थळी काही काळ गोंधळ निर्माण झाला.
पोलिसांकडून हस्तक्षेप, महिला कर्मचाऱ्यांना ताब्यात
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत माधवी जाधव यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर तत्काळ कठोर कारवाई करण्यात आली नसली तरी, कार्यक्रमातून बाहेर काढणे आवश्यक होते, असे पोलिसांनी सांगितले. ताब्यात घेताना माधवी जाधव म्हणाल्या, “मला निलंबित केले तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही. बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही.”
महाजनांविरोधात तक्रार दाखल, घोषणाबाजी
या घटनेनंतर माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी गिरीश महाजन यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांनी घोषणाबाजी करत मंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. वनविभागातील महिला कर्मचाऱ्यांनी ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
“बाबासाहेबांचे नाव भाषणात का नाही?” – माधवी जाधव
माधवी जाधव यांनी स्पष्ट भूमिका घेत म्हणाल्या, “लोकशाही आणि संविधानाचा खरा मानकरी ज्याने घडवला, त्याचे नाव प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात का नाही? मला निलंबित करा, पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही.” या घटनेनंतर राज्यभरात राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा सुरू झाली असून, नाशिकमधील प्रजासत्ताक दिनाचा सोहळा वादाच्या केंद्रस्थानी आला आहे.
गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
या संपूर्ण प्रकारानंतर गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपली प्रतिक्रिया दिली. “माझ्या भाषणात बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अनावधानाने राहिले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो,” असे महाजन म्हणाले.
आदिवासी मोर्चा, कुंभमेळा आणि राजकीय मुद्द्यांवरही भाष्य
पत्रकार परिषदेत महाजन यांनी इतरही मुद्द्यांवर भाष्य केले. आदिवासी मोर्चाबाबत ते म्हणाले, “उद्या कॅबिनेट बैठक आहे. आदिवासी मोर्चाचे शिष्टमंडळ मुंबईत येणार असून चर्चेतून मार्ग काढला जाईल.”
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, “कुंभमेळा साधू-महंतांचाच आहे. त्यांच्या सूचनांनुसार दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण केले जाईल. आखाड्यांवरील GST किंवा रॉयल्टीबाबत गैरसमज पसरवू नयेत.”
संजय राऊतांवर टोला
भगतसिंह कोश्यारी यांना पद्मश्री जाहीर झाल्यानंतर संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर महाजनांनी प्रत्युत्तर दिले. “राऊतांना एखादा मोठा पुरस्कार देण्याची वेळ आली आहे. ‘खोटं बोल पण रेटून बोल’ पुरस्कारासाठी मी स्वतः शिफारस करतो,” असा टोला त्यांनी लगावला.

