(ठाणे)
महासंचालनालयाच्या पालघर जिल्हा माहिती अधिकारी आणि कोकण विभागाच्या प्रभारी उपसंचालक म्हणून कार्यरत असलेल्या प्रसिद्ध लेखिका अर्चना गाडेकर–शंभरकर यांचे बुधवारी (दि. १५ ऑक्टोबर) दीर्घ आजाराने निधन झाले. त्या वयाच्या ५२व्या वर्षी होत्या.
त्यांच्या पश्चात पती प्रकाश शंभरकर, मुले डॉ. अप्रतिम आणि रीची शंभरकर, वडील भगवान गाडेकर, भाऊ डॉ. हेमंत गाडेकर, भाऊ अभिनेता जयंत गाडेकर, तसेच बहिण डॉ. मोना असा त्यांचा परिवार आहे.
अर्चना शंभरकर या प्रसिद्ध साहित्यिक आणि संवेदनशील लेखिका म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या ‘सोलमेट’ या कादंबरीला आणि ‘सारीनास’ या लघुकथा संग्रहाला वाचकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्या विदर्भातील सुप्रसिद्ध कवयित्री दिवंगत विमल गाडेकर यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या.
अर्चना या मूळ चंद्रपूरच्या रहिवासी असून सध्या खारघर, नवी मुंबई येथे वास्तव्यास होत्या. त्यांचे पार्थिव आज (गुरुवार) दुपारी १२ वाजल्यापासून खारघर येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता खारघर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

